न्यायालयात पुराव्यांतील विसंगतींवर भर — आरोपींना दिलासा
सोलापूर : गावडेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे ग्रामसेविकेला कामावर जाण्यापासून रोखून तिच्यावर मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण सप्ताळे, जयश्री सप्ताळे आणि भौरव्वा सप्ताळे या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. नवले यांनी निर्दोष मुक्त केले.

प्रकरणानुसार, ग्रामसेविकेने आपल्या शेताच्या बांधावरील सिमेंटचा खांब हलवण्याबाबत आरोपींना विचारले असता, त्यांनी शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता.
या घटनेत आरोपींनी धमक्या देत तिच्या गळ्यातील मिनी गंठण ओढून घेतल्याची फिर्याद मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंदवली होती.या प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ. शहानूर मुलाणी यांनी केला होता. सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.
मात्र, आरोपींचे वकील अॅड. आल्हाद अंदोरे आणि अॅड. अथर्व अंदोरे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि पुराव्यांतील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या.
न्यायालयाने तो युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी निर्दोष असल्याचे नमूद केले.सरकारतर्फे अॅड. शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिले.








