MH 13 NEWS NETWORK
सोलापूर, दि. ११ सप्टेंबर २०२५ –
सोलापूर शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत नाले भरून वाहू लागले असून, काही भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज बाधित भागांची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला.


या दौऱ्यात विद्यानगर, शेळगी ब्रिज, दहिटणे गाव, मित्रनगर, आणि जुना विडी घरकुल परिसर यासारख्या गंभीर प्रभावित भागांना भेट देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकूलवार, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनी घरगुती वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती दिली. आयुक्तांनी त्वरित मदतीसाठी प्रशासन सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाच्या वतीने 8 JCB, 10 डंपर, जलउपस मशीन, जेटिंग मशीन आणि पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत असून, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी स्थलांतराची व्यवस्था केली गेली आहे.

आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, “नालेवरील अतिक्रमण आणि चुकीच्या ले-आउटमुळे पाणी साचते आहे. अशा प्रकरणांची चौकशी करून नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
आपत्ती व्यवस्थापन विभागाशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन
शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाणी घरात शिरल्यास अथवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी त्वरित संपर्क साधावा.
महापालिका प्रशासन पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीजनक परिस्थिती टाळण्यासाठी पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.