सोलापूर :- मौजे वडाळा, ता. उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील राहणारी जयश्री उर्फ बाई चंद्रकांत भोसले, वय ५० वर्षे, हिने दिपक उर्फ दादा शिवाजी कोळेकर, वय ३५ वर्षे, यास पैसे देवाण घेवाण च्या कारणावरुन गाडे गल्लीत गटारीमध्ये आरोपीच्या घरासमोर लोखंडी पाईपने मयताच्या डोक्यात मारुन खुन केल्या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आझमी साो. यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, आरोपी व मयत यांच्यामध्ये पैशाची देवाण-घेवाण करुन कुरबुर व भांडणे होत होती व आरोपी ही मयताच्या घरी पैसे मागण्याकरीता वारंवार जात होती. मयताने काही रक्कम जनावरे, ट्रॅक्टर, नांगर, फण असे साहित्य विकून आरोपीस पैसे दिले होते, तरी परंतु अजुनही पैसे आहेत, म्हणून आरोपी मयताच्या घरी जावून भांडत होती व राहिलेले पैसे परत दे, असे धमकावत होती. त्यामुळे दि.२३/०४/२०२२ रोजी दुपारी ४ वा. च्या सुमारास मयत हा वडाळा गावातील पान टपरीवर बसला होता.
त्यावेळी आरोपी व २-३ लोक तेथे आले व मयतास मोटारसायकलवरुन अनोळखी ठिकाणी घेऊन गेले. नंतर ८:३० च्या सुमारास गावातील एका माणसाने आरोपी हीने मयत दादा कोळेकर यास आरोपीच्या घरासमोरील गटारीमध्ये लोखंडी रॉडने मारुन टाकले आहे. असे मयताच्या वडिलास सांगितले. त्याप्रमाणे मयताच्या वडिलाने तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता पोलीसांनी भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खुन केल्याप्रकरणी आरोपीविरुध्द फिर्याद नोंदविली व सदर घटनेचा तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मे. कोर्टात दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आझमी साहेब यांच्यासमोर झाली.
सदर खटल्यात फिर्यादी, पंच, ठाणे अंमलदार व तपासिक अंमलदार हे साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यात युक्तिवाद करताना आरोपीचे वकील अॅड. साहेब जाधव यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, मयत हा दारुच्या नशेत गटारीमध्ये पडून मयत झाला.
परंतु गावातील राजकीय द्वेषापोटी आरोपीवर खोटी केस दाखल केली आहे. सदर खटल्यात साक्षीदाराच्या जबाबात तफावत आढळल्याने मे. कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्यात आरोपीतर्फे अॅड. बाबासाहेब जाधव, अॅड. सारिका सारंगमट, फिर्यादीतर्फे अॅड. सागर पवार तर सरकारतर्फे अॅड. गुंडे यांनी काम पाहिले.