MH13NEWS Network
सोलापूर (प्रतिनिधी) — विनायक उर्फ हर्षल बाळकृष्ण बोजा (वय 32, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर) यांच्या खूनप्रकरणी अटक झालेल्या रमेश उर्फ शाम मल्लेशम गुणतूक (वय 24, रा. विडी घरकुल, सोलापूर) या आरोपीला कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की,..

मयत विनायक याने सहआरोपी नागेश लागशेट्टी याच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे परत न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला होता.
या वादातून नागेश याने विनायकचा खून करण्याचा कट रचला होता.दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता विनायक आपल्या मोटारसायकलवरून जात असताना स्वराज्य तरुण मित्र मंडळाच्या गणपती मंदिराजवळील मैदानात आला.
तेव्हा अर्जदार रमेश गुणतूक व इतर पाच आरोपींनी त्याच्यावर चाकू आणि सिमेंटच्या ठोकळ्याने हल्ला करून त्याचा खून केला. या घटनेची फिर्याद मयताची आई राधाबाई बाळकृष्ण बोजा यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रमेश यास अटक केली होती.
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने रमेशचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आरोपीने ॲड. रितेश थोबडे यांच्या मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.सुनावणीदरम्यान ॲड. थोबडे यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की आरोपीचा या गुन्ह्यात सक्रिय सहभाग नाही.
न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत रमेश गुणतूक यास 20,000 रुपयांच्या जातमुचुलक्यावर जामीन मंजूर केला.या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे आणि ॲड. मनोज पामुल यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲड. एन. बी. पाटील यांनी काम पाहिले.









