सोलापूर – सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी विविध प्रभागांत आक्रमक प्रचार करत थेट आव्हान उभे केले असून, त्यात प्रभाग क्रमांक १८ हा हाय-व्होल्टेज प्रभाग म्हणून चर्चेत आला आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्या बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी शिवसेनेच्या उमेदवारांची भव्य प्रचार रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत उमेदवार संतोष संगा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
ही रॅली ‘लाडक्या बहिणी’च्या भेटीच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली असून, मतदारांशी थेट संवादावर भर देण्यात येणार आहे.या प्रचार रॅलीमध्ये निर्मला पासकंटी, महादेवी व्हितनळ्ळी, सुनील निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालणाऱ्या या रॅलीचा शुभारंभ लोकसेवा हायस्कूल येथून होणार आहे.या भव्य रॅलीमुळे प्रभाग १८ मधील राजकीय समीकरणे आणखी तापणार असून, येथे चुरशीची व तगडी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर, प्रभाग १८ मध्ये प्रचाराचा गिअर आता टॉपमध्ये गेला आहे.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी पक्षाचे मातब्बर नगरसेवक प्रतिनिधित्व करत असतानाही अपेक्षित विकास न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
भाजपाची मागील पाच वर्षे सोलापूर महापालिकेत सत्ता असतानाही या प्रभागातील गोरगरीब व कष्टकरी जनतेपर्यंत मूलभूत विकासकामे पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे प्रभाग १८ मधील जनतेचा रोष आता उघडपणे व्यक्त होताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या शिवसेनेला यावेळी प्रभाग १८ मधून संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
श्रीनिवास संगा यांचा शिवसेनेतील प्रवेश सत्ताधाऱ्यांसाठी ठरणार डोकेदुखी..
विशेष म्हणजे भाजपामध्ये योग्य सन्मान न मिळाल्याने नाराज असलेले तेलुगू समाजाचे युवा संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. गोरगरीब समाजात असलेली त्यांची लोकप्रियता आणि तळागाळात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच लाभदायक ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.प्रभाग क्रमांक १८ मधून श्रीनिवास संगा यांचे धाकटे बंधू संतोष संगा यांची उमेदवारी माजी महापौर व प्रस्थापित नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.
तसेच भाजपाचे जुने जाणकार नागेश पासकंटी यांच्या सुविद्य पत्नी सौ. निर्मला पासकंटी, हटगार-कोष्टी समाजातील सुप्रसिद्ध सौ. महादेवी व्हितनळ्ळी आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील निंबाळकर यांचा समावेश असलेली शिवसेनेची ही मजबूत पॅनल प्रभागात प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या भव्य पदयात्रा रॅलीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तेलुगू समाजाचे युवा नेते श्रीनिवास संगा यांनी मतदारांना केले आहे.








