MH 13 NEWS NETWORK
पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा कुलगुरूंचा निर्णय; बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची सुवर्णसंधी
सोलापूर, दि. 25 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बीएससी, बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसीए आणि बिलीब अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात बारावीनंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हे प्रथमच झाले असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक, अद्यावत सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, लॅबोरेटरीज, इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वस्तीगृहाची देखील सोय राहणार आहे.
बीएससी पदवी अभ्यासक्रमांसाठी या विषयांची उपलब्धता
बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर बीएससी पदवीसाठी थेट प्रवेश घेता येणार आहे. याकरिता मॅथेमॅटिक्स, स्टॅटटिक्स कॉम्प्युटर सायन्स, जिओलॉजी, एनवोर्मेन्ट सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मासिटिकल टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झूलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहे.
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बीकॉम प्रोफेशनल नवीन पदवी अभ्यासक्रम
बारावी कॉमर्सच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदा प्रथमच बीकॉम प्रोफेशनल अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याबरोबरच विद्यापीठ कॅम्पसमध्ये यंदा प्रथमच कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीबीए, बीसीए आणि बिलीब पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश घेता येणार आहे.
पदवीसाठी थेट प्रवेश प्रक्रिया सुरू
विद्यापीठ संकुलात बीएससी, बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसीए आणि बिलीब अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. दि. 22 मे 2024 पासून ही नोंदणी सुरू असून याकरिता विद्यार्थी व पालकांना विद्यापीठास भेट देता येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या www.sus.ac.in संकेतस्थळावरून देखील अधिक माहिती घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांना विद्यापीठात भेट देता येणार आहे. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी डॉ. धवल कुलकर्णी (मो. 9423591360), डॉ. मुकुंद माळी(8830326615) व डॉ. सदानंद शृंगारे (9096588918) यांच्याशी विद्यार्थ्यांना संपर्क करता येणार आहे.
नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू होणार…
यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीएससी पेन्ट टेक्नॉलॉजी, बीएससी पॉलिमर टेक्नॉलॉजी, बीएससी इन फार्मासिटिकल अँड केमिकल्स टेक्नॉलॉजी, बीएससी इन फूड टेक्नॉलॉजी, बीएससी इन कॉन्स्ट्रक्शन केमिकल्स, बीएससी एन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, बीएससी बीएड, बीए बीएड, बीएससी बिपीएड, बीए बीपीएड, एम एड, एमपीएड आदी नवीन अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू होणार आहेत.
आर्टिफिशल इंटेलिजन्सबरोबरच अनेक अभ्यासक्रम..
- बीएससी इन डाटा सायन्स अँड बिझनेस अनालिसिस (3+1 वर्ष)
- एम एस सी इन डाटा सायन्स अँड बिग डाटा अनालिसिस (2 वर्ष)
- बीएससी इन डाटा इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशल इंटेलिजन्स (4 वर्ष)
- पीजी डिप्लोमा इन डाटा सायन्स अँड बिझनेस एनालिसिस (1 वर्ष)
- बीएससी इन सायबर सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी (3 वर्ष)
- एमएससी इन सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट अँड पॉलिसी (2 वर्ष)
- बी टेक एन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक (4 वर्ष)
- एमटेक इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक ( 2वर्ष)
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी (1 वर्ष)
- एमबीए इन बिझनेस अनालिटिक्स 2 वर्ष
प्रवेश पूर्व परीक्षेसाठी 26 मे पर्यंत अर्ज करता येणार…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून यासाठी दि. 26 मे 2024 पर्यंत विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स- अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स, एमएससी इलेक्ट्रॉनिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक अंड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. तसेच विद्यापीठ संकुलातील एमएससी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मटिक्स या अभ्यासक्रमांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. विद्यापीठ संकुलातील एमएससी केमिस्ट्रीच्या पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रियल, मेडिसिनल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक, फिजिकल, एनालिटिकल, फार्मास्युटिकल एमएससी इन्व्हरमेंटल सायन्स, एमएससी कम्प्युटर सायन्स मॅथेमॅटिक्स, एमएससी स्टॅटिस्टिकस, एमएससी बायोस्टॅटिस्टिकस, एम.ए.मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे. याचबरोबर एमएससी बॉटनी, झूलॉजी, एमएससी ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, इंटरप्रिनरशिप या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. विद्यापीठ संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विद्यापीठ अधिविभागात या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश…
एमएससी जिओलॉजी, जिओइन्फॉर्मेटिक्स, एम.ए. प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इतिहास, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एम.ए.मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू , पाली, प्राकृत आणि कन्नड, एम. ए. संगीत, नाटक, तबला व पखवाज आणि व्हिज्युअल आर्ट्स, एम.कॉम. ऍडव्हान्स अकाउंटन्सी, ऍडव्हान्स बँकिंग, बीव्होक पत्रकरिता व जनसंज्ञापन, ऍडव्हान्स पी जी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, पी जी डिप्लोमा इन म्युझिकोलॉजी, फाईव्ह इयर एमटेक कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, पीजी डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम. ए. योगा या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाच्या परिसरातील अधिविभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. धवल कुलकर्णी, डॉ. सदानंद शृंगारे आदी उपस्थित होते.