MH13NEWS Network
सोलापूर / प्रतिनिधी :
सोलापूर शहरातील हाय व्होल्टेज आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबली असून “तुमचे मत, आमचे व्हिजन – प्रभाग सातचे परिवर्तन” या संकल्पनेसह चारही अधिकृत उमेदवारांनी होम-टू-होम प्रचार करत संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सातमध्ये भाजपने विकास, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत नागरी सुविधांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या प्रचाराला वेग आला असून स्थानिक नागरिकांमध्येही परिवर्तनाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.
भाजपचे अधिकृत उमेदवार नाना काळे, आनंद कोलारकर, उत्तरा बरडे–बचूटे आणि श्रद्धा पवार यांनी घराघरांत जाऊन प्रभागातील प्रश्न ऐकून घेत विकासाचा स्पष्ट आणि वेळबद्ध आराखडा मतदारांसमोर मांडला.
यंदा केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याचा दावा उमेदवारांनी केला.
हे आहेत प्रचाराचे मुख्य मुद्दे..
प्रचारादरम्यान मुलांसाठी क्रीडांगण, महिलांसाठी स्वतंत्र व सुसज्ज प्रसाधनगृहे, गजबजलेल्या नवी पेठ परिसरात पार्किंगची व्यवस्था, आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत आणि मोफत अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
विशेषतः महिलांसाठी अवंती नगर, वसंत विहार, निराळी वस्ती, अरविंद धाम, यश नगर आणि अभिमानश्रीनगर या भागांमध्ये भाजी मंडई सुरू करून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यात येणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
यामुळे स्थानिक महिला बचत गटांना थेट लाभ होणार असल्याचा दावा करण्यात आला.
सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी कायमस्वरूपी आणि सुसज्ज मोफत सेवा नोंदणी केंद्र उभारले जाणार असल्याचे भाजपचे उमेदवार तथा माजी उपमहापौर नाना काळे यांनी सांगितले.
आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी रस्त्यालगत वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, भाजपने या प्रभागात महिलांच्या सुरक्षितता आणि स्वावलंबनाचा मुद्दा आघाडीवर ठेवत प्रचारात ठळकपणे मांडला आहे.
माजी उपमहापौर नाना काळे यांचा फोकस –
मूलभूत सुविधा आणि प्रशासनातील अनुभवभाजपचे उमेदवार व माजी उपमहापौर नाना काळे यांनी प्रभाग सातमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते, उद्याने आणि नागरिकांसाठी सेवा केंद्रे सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून प्रशासनातील अनुभवाचा उपयोग करून कामे वेळेत पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्तरा बरडे–बचूटे यांचा अजेंडा –
महिला सुरक्षा आणि रोजगारभाजपच्या पॅनलमधील उच्चशिक्षित महिला उमेदवार उत्तरा बरडे–बचूटे यांनी महिलांच्या सुरक्षितता व स्वावलंबनाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. नवी पेठ परिसरात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, स्वसंरक्षणासाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण केंद्र तसेच घरबसल्या महिलांच्या हाताला काम देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा ठोस आराखडा तयार असल्याची माहिती त्यांनी दिली.








