MH 13 NEWS NETWORK
अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर
*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

*साहित्यिक डॉ. शिवाजी शिंदे, धर्मशाळे, मारुती कटकधोंड, गिरीश दुनाखे यांच्याकडून कवितांचे सादरीकरण
*अप्पर जिल्हाधिकारी यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गझल गायन केले

सोलापूर, दिनांक 28 ( जिमाका):- राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. शासनाने सर्व शासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तरी सर्व शासकीय विभागाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही जाणीवपूर्वक जास्तीत जास्त व्यवहार मराठी भाषेत करावेत व भाषा संवर्धनात पुढाकार घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी केले

.
नियोजन भवन सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी अंजली मरोड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, साहित्यिक मारुती कटकधोंड, चंद्रकांत धर्मशाळे, गिरीश दुनाखे, तहसीलदार श्रीकांत पाटील, समीर यादव यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व साहित्यिक उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर पुढे म्हणाले की, आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढवावा. प्रशासन ही मराठी भाषेचा वापर करत आहे. मराठी भाषा वापरत असताना भाषेची शुद्धता ही महत्त्वाची आहे, त्यावरही सर्वांनी जाणीवपूर्वक काम करावे. केंद्र शासनाने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे सर्व मराठी भाषिक नागरिकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून आपल्या भाषेचा जास्तीत जास्त वापर करून भाषा मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होईल तसेच मराठीत साहित्य कृती निर्माण होतील या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले की, प्रत्येक कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. शासकीय कार्यालयात मोबाईलच्या अतिवापरामुळे कर्मचाऱ्यांचा परस्परातील संवाद अत्यंत कमी झालेला आहे तरी सर्वांनी परस्परात योग्य संवाद ठेवावा तसेच तो संवाद मराठी भाषेतच करावा असेही त्यांनी सुचित केले. हत्तरसंग कुडल या गावाला पुस्तकाचे गाव ही योजना जाहीर झाली. तसेच मोडनिंब येथे कैलास काटकर यांचे केस कर्तनालय आहे, तेथे त्यांच्या दुकानात जवळजवळ 350 पुस्तके आहेत आणि दररोज 70 ते 80 लोक तेथे येऊन पुस्तके वाचतात. तेथील पुस्तके वाचणाऱ्या लोकांना विशेष सवलत ते देतात. यातून मराठी भाषेचे संवर्धन होण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे असेच उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी झाल्यास मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढेल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
काव्यवाचन-
डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी माणसे ही कविता सादर केली.
“का अशी माणसाशी वागतात माणसे
आपल्याच माणसांना छळतात माणसे
किरकोळ कारणांनी पेटतात माणसे
का अशी माणसाशी वागतात माणसे
कामापुरतीच गोड बोलतात माणसे
का अशी माणसाशी वागतात माणसे”
या कवितेतून कवीने सध्या माणसा माणसात कशा पद्धतीचे वागणे वर्तणूक आहे याचे अत्यंत स्पष्टपणे वर्णन केलेले आहे.
त्यानंतर कवी चंद्रकांत धर्मशाळे यांनी माझी मायबोली जगात महान, मारुती कटकधोंड यांनी काळ गिरीश दुनाखे यांनी देवभट ही कविता सादर केली.
तसेच अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी “जय जय महाराष्ट्र माझा” व “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत गायले .
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रास्ताविक केले व मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रम आयोजनाच्या उद्देश सांगितला तसेच या कार्यक्रमात कवींना आमंत्रित केलेल्या असून काव्य वाचनाचा कार्यक्रमही होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी अंजली मुरोड यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.