mh 13 news network
विक्रमी मताधिक्याने विजय मिळवलेल्या महायुतीला नागरिकांच्या अनेक अपेक्षांना सामोरे जावे लागणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सोलापूरला काय मिळणार ? याची प्रतीक्षा सोलापूरकरांना लागली आहे.
अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट सोलापुरात यावे, विमानतळ सुरू व्हावे, विमान सेवेच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय वाढीस लागावे अशी सर्वसाधारण नागरिकांना अपेक्षा आहे.
अभियांत्रिकी शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण विद्यार्थ्यांना घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी रेटा लावणे गरजेचे आहे.
समांतर जलवाहिनी यासाठी निधीची कमतरता भासू शकते, पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात ऐरणीवर येणार आहे. त्या अनुषंगाने आमदारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न धसास लावणे गरजेचे आहे. सोलापूरच्या पारड्यात यंदा काय पडते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
काही महत्त्वाचे मुद्दे..
शहराची परिवहन सेवा जिवंत राहण्यासाठी राज्य सरकारने टेकू देणे गरजेचे आहे. यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारचे लक्ष वेधले पाहिजे.
उडान योजना ही केंद्राची असून सोलापूरच्या काही मार्गावरती लागू नाही त्यामुळे राज्य सरकारने ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र त्यावर त्वरित निर्णय झाल्यास, अथवा अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्यास विमानसेवा सुरू होण्यास विलंब लागणार नाही आणि ती बंदही होणार नाही.
हिप्परगा तलावातील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद व्हावी जेणेकरून सोलापूरची पाणीबाणी कमी होण्यास मदत होईल.
ब्रेन ड्रेन होणार नाही…
राज्याचे स्वतंत्र आयटी धोरण आहे. त्यानुसार आयटी पार्कची उभारणी केली पाहिजे. जेणेकरून सोलापुरातला युवा वर्ग येथेच रोजगार शोधू शकेल. कार्यशक्ती असलेल्या युवा वर्गाचे ब्रेन ड्रेन होणार नाही.
राज्याचा आयुष विभाग आहे. त्यामार्फत सोलापुरातील तालुक्यांमध्ये आयुष केंद्र उभा करण्यासाठी निधीची गरज असणार आहे.
आयुष केंद्र आल्यास हॉस्पिटल वरील ताण कमी होईल.
आहार -विहार,जीवनशैली, नियमित योगासने याचे मार्गदर्शन या केंद्राद्वारे केले जाते.
आणि जरी आजारी पडलात तरी विना औषधोपचार पद्धती जीवनात कशी वापरायची याचा प्रसार आणि प्रचार या आयुष केंद्राद्वारे केला जातो.