MH 13 News Network
सोलापूरकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढलेले आहेत. त्यानुसार शहरातील दहा किलोमीटरचा परिसर हा अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील छत्रपती संभाजी महाराज नगर तलाव परिसर, भुईकोट किल्ला परिसर या ठिकाणी अचानक कावळे, घार आणि बगळा पक्षी यांची अनैसर्गिक मरतुक झाली होती. दहा मार्च रोजी त्याचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यांचा रिपोर्ट बर्ड फ्लू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बर्ड फ्लू चा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि किल्ला परिसर येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधक उपयोजना केल्या आहेत. त्यानुसार तलाव परिसर, किल्ला परिसर येथील दहा किलोमीटर एरियातील परिसर हा अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी इतर पक्ष व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

या बाधित क्षेत्रातील परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले असून दहा किलोमीटर क्षेत्रातील कोंबड्यांचे सर्वेक्षण करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्षांचे नमुने व मृत पक्षी तत्काळ तपासणीसाठी पाठवावेत व अहवाल सादर करावा असे सांगण्यात आले असून मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्तांची नेमणूक करण्यात आली आहे.