MH 13 NEWS NETWORK
सोलापुरातील भीम जयंती हे राज्यातील प्रमुख आकर्षण मानले जाते. येथील मिरवणूक पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून नागरिक सोलापुरात येतात. यंदाच्या भीम जयंती उत्सवासाठी महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 13 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा सप्ताह साजरा केला जातो, त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जातात.

महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ,अस्थीविहार तसेच मिरवणूक मार्गाची अधिकाऱ्यांसोबत
पाहणी केली.
या वेळी आयुक्त यांनी मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे,मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करणे इत्यादी सोयीसुविधा करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावरील कामे 13 एप्रिल पूर्वी करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित खात्याच्या प्रमुखांना दिल्या.
पाहणी दौऱ्यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विभागीय अधिकारी हिदायत मुजावर, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर उद्यान प्रमुख किरण जगदाळे यांच्या अधिकारी उपस्थित होते