मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवारी सोलापुरातील आर्थिक दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना हक्काची घरे वितरण समारंभात आले होते. यावेळी त्यांनी सोलापूरकरांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘सोलापूर’साठी हा ऐतिहासिक निर्णय” असल्याची आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सोलापूर / प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये उद्योग विभागाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली. सोलापूरसारख्या पारंपरिक उद्योगांनी समृद्ध असलेल्या शहरात हा निर्णय म्हणजे रोजगार, गुंतवणूक आणि तांत्रिक प्रगतीचे नवे पर्व सुरू करणारा ठरणार आहे. या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानत ही घोषणा सोलापुरासाठी “ऐतिहासिक व क्रांतिकारक” ठरेल, अशी ठाम भूमिका मांडली.
विशेष प्रतिनिधीशी संवाद साधताना आमदार कोठे म्हणाले, “वर्षा निवासस्थानी झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या बैठकीत मी सोलापुरात आयटी पार्कची मागणी केली होती. त्यासंदर्भात १५ जुलै रोजी लेखी निवेदनही दिले होते.

आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री साहेबांनी आयटी पार्क मंजूर करण्याची घोषणा केली. हा निर्णय सोलापुरासाठी एक गेम-चेंजर आहे. यामुळे रोजगारनिर्मिती, उद्योजकतेला चालना आणि सोलापूरच्या भविष्यास नवा आयाम मिळेल.”
ते पुढे म्हणाले की, “आज सोलापूर प्रामुख्याने कापडउद्योग, भाकरीसारखा खाद्यउद्योग आणि पारंपरिक व्यावसायावर अवलंबून आहे. पण आता आयटी पार्कमुळे सोलापूर टेक्नॉलॉजी व इनोव्हेशनच्या नकाशावर ठळकपणे उमटेल.

आपल्या तरुणाईला पुणे-मुंबईकडे स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. शहरातच दर्जेदार नोकऱ्या, नव्या गुंतवणुकीच्या संधी आणि स्टार्टअप्सना बळकटी मिळेल.
”शेवटी आमदार कोठे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आजच्या घोषणेमुळे माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी त्रिवार हार्दिक आभार मानतो. सोलापूरसाठी ही घोषणा एक सुवर्णसंधी आहे, ज्याचा फायदा पुढील अनेक पिढ्यांना मिळणार आहे.

”Devendra Fadnavis Kothe Devendra Rajesh Jaykumar Gore CMOMaharashtra