पत्नीची छेडछाड केल्याच्या वादातून झालेल्या खुनाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता
पंढरपूर / प्रतिनिधी
पत्नीची छेडछाड केल्यामुळे चिडून जाऊन अमर ज्ञानु खिलारे (रा. शिरभावी, ता. सांगोला) याचा चाकूने खून केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या लक्ष्मण जगन्नाथ तांबे आणि देवप्पा पांडूरंग तांबे (दोघे रा. धायटी, ता. सांगोला) या दोघांची पंढरपूर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

मयत अमर खिलारे हा पेंटिंगचे काम करत होता. त्याने आरोपींच्या घराचे पेंटिंग करण्याचे काम स्वीकारले होते. त्याचा मृतदेह धायटी शिवारातील तांबे मळ्यात आढळून आला होता.
या प्रकरणी अमरचा भाऊ चंद्रकांत खिलारे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.तपासादरम्यान पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की, पेंटिंगचे काम करत असताना अमरने आरोपींपैकी एकाच्या पत्नीची छेडछाड केली.
याच रागातून दोन्ही आरोपींनी अमरचा चाकूने खून केल्याचा आरोप करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर सांगोला पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.परंतु न्यायालयाने आरोपीविरुद्ध असलेले परिस्थितीजन्य पुरावे विश्वासार्ह आणि पुरेसे नसल्याचे नमूद करत दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम आणि ॲड. वैभव सुतार यांनी बाजू मांडली.