सोलापूर | प्रतिनिधीसोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीने प्रचाराची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा सोलापुरातील पहिला अधिकृत शुभारंभ रविवारी सकाळी ९ वाजता देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात होणार आहे.या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार असून, त्यानंतर ते थेट प्रभागातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे यांनी दिली.

या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांची उपस्थिती राहणार आहे
.प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडून सोनाली अर्जुन गायकवाड, सुनील पांडुरंग खटके, मृण्मयी महादेव गवळी आणि गणेश प्रकाश वानकर हे चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत.रविवारच्या या कार्यक्रमानंतर प्रभाग क्रमांक ६ मध्ये निवडणूक प्रचाराला प्रत्यक्ष मैदानात वेग येणार असून, “शत प्रतिशत भाजप” आणि “अब की बार ७५ पार” या घोषणांसह भाजपाने प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे.
यापूर्वी सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता राहिल्याच्या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा चारही जागांवर विजय मिळवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.








