mh 13 news network
सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी “प्रत्येक मताचे महत्त्व” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेमार्फत सर्जनशील व लोकसहभागात्मक पद्धतीने विविध मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शहरातील सर्व खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित तसेच मनपा शाळा व महाविद्यालयांमध्ये दि. २९ डिसेंबर २०२५ ते दि. ०५ जानेवारी २०२६ या कालावधीत व्यापक स्वरूपात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.

या कालावधीत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच मतदान जनजागृती रॅली यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क, लोकशाहीतील मताचे महत्त्व, जबाबदार नागरिक म्हणून मतदान करण्याची गरज याविषयी प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

या मतदान जनजागृती उपक्रमात शहरातील एकूण ८९ शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला असून सुमारे १५,००० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील सादरीकरणातून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असून विशेषतः नवमतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह निर्माण झाला

आहे.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मतदान जनजागृतीसाठी मोलाचा हातभार लावला आहे. लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरत असून आगामी निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास सोलापूर महानगरपालिकेने व्यक्त केला आहे








