आजवरच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूरची मतदान टक्केवारी अधिक असल्याबद्दल कौतुक
कोल्हापूर : अनेक बाबींत अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले मतदान झाले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही देश आणि राज्यातील मतदानाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्या, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिल्या.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात सर्व नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या संपर्क पुस्तिकेचे (कम्युनिकेशन प्लॅन) अनावरण करण्यात आले. तत्पुर्वी एस.चोक्कलिंगम यांनी दोन्ही मतदार संघाच्या मतमोजणी ठिकाण, स्ट्राँग रुमची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
श्री. चोक्कलिंगम म्हणाले, देशाची लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर 90 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी प्रोत्साहन द्या. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर बक्षीस योजना राबवून अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. मतदारांच्या जनजागृतीवर भर देण्याबरोबरच यापूर्वी कमी मतदान झालेल्या भागांवर व ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन मतदानाची टक्केवारी वाढवा. यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांचे सहकार्य घ्या. कामगारांनी मतदान करावे यासाठी विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत व कंपन्यांच्या मालकांसोबत बैठक घ्या. मतदानासाठी कामगारांना भर पगारी सुट्टी जाहिर केली असून मतदाना दिवशी मालक व कामगारांनी मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागृती करताना कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार होत नसल्याची खात्री करा.
निवडणूक कामकाजाचा आढावा घेतना ते म्हणाले, रांग विरहीत मतदान केंद्रासाठी भर द्या. यासाठी प्रत्येक मतदान केंद्र स्थळी प्रतीक्षा कक्ष स्थापन करा, जेणेकरुन मतदारांना रांगेत उभे रहावे लागणार नाही. दिव्यांग मतदारांना व्हील चेअर व अन्य आवश्यक त्या सुविधा द्या. कडक उन्हाळा असल्यामुळे मतदान केंद्रांवर सोयी सुविधा द्या. मतदान केंद्र स्थळी स्वच्छता अभियान राबवा. निवडणूक विषयक येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करा. एक खिडकी योजना प्रभावी करा. कोणत्याही तांत्रिक कारणामुळे मतदान प्रक्रियेवर बाधा येणार नाही, याची दक्षता घ्या. निवडणूक कामातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घर बसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी योग्य नियोजन करा. उमेदवारांच्या प्रचाराचा खर्च त्या त्या उमेदवारांच्या खात्यात नोंद करा. सर्व तपासणी नाके व जिल्ह्याच्या सीमांवर येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करा. संशयित रक्कम आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा. यावेळच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडीयाचा वापर वाढला असल्यामुळे सोशल मीडीयामध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा. यासाठी सायबर विभाग गतिमान करा. माध्यम प्रमाणिकरण सनियंत्रण समितीने फेक न्यूज व पेड न्यूजवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल याची दक्षता घ्या. आचारसंहिता भंगांच्या घटना आढळून आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करुन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्या, असेही सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादरीकरणातून निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले, निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक कामकाजातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. इव्हीएम मशीनचे रँडमायझेशन ( सरमिसळ) झाले आहे. भरारी पथके, स्थिर पथके स्थापन करण्यात आली असून तपासणीच्या कामास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात युथ आयकॉनच्या सहकार्याने स्वीप जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. मानवी रांगोळी, रन फॉर वोट (लोकशाही दौड) च्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली आहे. यापूर्वी कमी मतदान झालेल्या भागातील तसेच डोंगराळ भागातही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मीडिया कक्ष, एमसीएमसी समिती, एक खिडकी योजना, नियंत्रण कक्ष, खर्च नियंत्रण कक्ष आदी विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून या कक्षांमार्फत कामकाज करण्यात येत आहे.
आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सादरीकरणातून दिली.