सोलापूर —HALO मेडिकल Foundation व Glenmark Life Sciences Pvt.Ltd. यांच्या “प्रोजेक्ट संपुर्ण ” अंतर्गत सीएसआर निधी मधुन सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृह करिता दोन Laproscope (बिनटाक्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे यंत्र) , सक्शन मशीन, Ventouse मशीन तसेच शहरातील १३० आशा स्वयंसेविका यांना नवजात शिशू तपासणीचे किट वितरण करण्याचा सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या अध्यक्षते खाली पार पडला.
सदर साहित्य हे अंदाजे १५ लक्ष रुपयांचे असुन त्याचा फायदा शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक गोरगरीब,वंचित घटकांना होणार आहे.लोकसंख्या नियंत्रण करिता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महत्वाची असतेच परंतु याच बरोबर ती सुरक्षितरित्या करणे देखील तेवढेच महत्वाचे असते. त्यामुळे Laproscope मशीन द्वारे ही सुरक्षितता प्रदान होते. कमी वेळात आणि बिनटाका शस्त्रक्रिया याद्वारे होत असल्याने आजकाल या यंत्राचे महत्व प्रत्येक प्रसुतीगृहात अनन्य साधारण असेच आहे. महिलांच्या विविध आजाराचे तसेच वंध्यत्वाच्या समस्येचे निदान देखील या यंत्राद्वारे शक्य असते.
प्रसुतीपश्चात नवजात शिशू घरी आल्यावर दर आठवड्याला आशा स्वयंसेविका त्यांची गृहभेटिद्वारे तपासणी करतात. बाळाची वाढ योग्यरित्या होत असल्याची खात्री करून घेतली जाते. तसेच काही आजारपण उद्भवल्यास त्यांना संदर्भ सेवा प्रदान करतात.
सदर बाबतीत त्यांना नवजात शिशू तपासणीचे किट (HBNC) आवश्यक असते. सदर किट मध्ये थर्मामीटर, वजनकाटा, ऑक्सीमिटर, ग्लुकोमीटर , रक्तदाब मोजण्याचे स्वयंचलित यंत्र इ.साहित्य देण्यात आले आहे.या सर्व बाबी मातामृत्यू व बालमृत्यु प्रमाण कमी करणे तसेच वेळीच संदर्भ सेवा प्रदान करण्याकरिता आवश्यक आहेत.याकामी HALO Foundation व Glenmark Life Sciences Pvt Ltd यांचे सोलापूर महानगरपालिका व परिसरातील नागरिक यांच्यासाठी मोठे योगदान प्राप्त झाले आहे.
सदर लोकार्पण कार्यक्रमासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशन चे संचालक डॉ.क्रांती रायमाने, ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचे श्री.सीताराम बेलदार , मनपा उपायुक्त विद्या पोळ, आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सोडल , शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अतिश बोराडे , शहर लेखा व्यवस्थापक श्री. सिद्धेश्वर बोरगे तसेच मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होते.याप्रसंगी मा.आयुक्त यांनी सोलापूर शहर व परिसरातील गरजू नागरिकांनी पू.रा.अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृह येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
त्याच बरोबर शहरातील माता व बालमृत्यू दर हा आधुनिक आरोग्य सुविधा दिल्याने निश्चितपणाने कमी होत असल्याचे नमूद केले. मा.आयुक्तांनी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना सर्वतोपरी सहकार्य करावे जेणे करून आपल्या शहरातील नवजात शिशु यांची निकोप व सुदृढ वाढ होण्यास मदत होईल असे आवाहन याप्रसंगी केले.सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांनी आशा स्वयंसेविका यांना नवजात शिशु तपासणी किट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्याच बरोबर शहरातील आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र, आपला दवाखाना, प्रसुतीगृहे व पॉलीक्लिनिक येथील विविध सुविधा यांचे शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.हॅलो मेडिकल फाउंडेशन चे संचालक डॉ. क्रांती रायमाने यांनी गेल्या ३० वर्षापासून संस्था सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असून सोलापूर शहरातील दाराशा, नई जिंदगी, विडी घरकुल,रामवाडी व भावनाऋषी या आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील परिसरात कामकाज करीत असल्याचे सांगितले.
ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस चे श्री. सीताराम बेलदार यांनी याप्रसंगी ९० देशात औषधे विक्री करीत असलेली ग्लेनमार्क ही सूचीबद्ध कंपनी असून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात देखील हॅलो मेडिकल फाउंडेशन सोबत कामकाज करीत असल्याचे नमूद केले. भविष्यात देखील असेच सहकार्य सोलापूर महानगरपालिका आरोग्य क्षेत्रात करण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ . मंजिरी कुलकर्णी यांनी शहरातील इतर प्रसूतिगृहे व नागरी आरोग्य केंद्रे देखील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होत असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.सदर सोहळ्यात आभार प्रदर्शन पू. रा.अहिल्यादेवी होळकर प्रसुतिगृह येथील मुख्य स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांनी केले.