MH13 NEWS NETWORK
मुंबई उपनगर : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी सकाळी 6.30 वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोग, बाईक्स मुंबई, मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने ही सायकल रॅली काढण्यात येईल. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात होईल. त्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने दक्षिण मुंबई, एनसीपीए, अंधेरी क्रीडा संकुल, बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर या चार ठिकाणी रॅलीचा समारोप होईल.
लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा राष्ट्रीय महोत्सव आहे. या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही सायकल रॅली काढण्यात येईल. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी गुगल फॉर्म भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विश्वनाथ अय्यर यांच्या मोबाईल क्रमांक 9619444027 व कमल गाडा यांच्या मोबाईल 9821025381 क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.