तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी माध्यमांना दिली आहे. यामुळे नवे सामाजिक समीकरण मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आणि जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या स्ट्रॅटेजीमुळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक नेतृत्व म्हणून आनंद चंदनशिवे यांच्याकडे पाहिले जाते. तर अल्पसंख्यांक समाजातील लोकप्रिय चेहरा म्हणून तोफिक शेख यांची ओळख आहे. या दोघांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत इंट्री झाल्याने शहरातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात. हे हेरून अजित पवारांची सोलापुरातील सावली ठरलेले उमेश पाटील आणि कट्टर समर्थक संतोष पवारांनी शहर जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करण्याचा चंग बांधला आहे. त्याचीच एक झलक म्हणून सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयाच्या दालनात सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते तौफिक शेख,माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांची राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीत सोलापूर शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक या विषयावर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
चंदनशिवे यांनी सोलापूर शहरातील रमाई घरकुल योजना, दुहेरी पाईपलाईन ,सोलापूरची विमानसेवा अशा विविध विकासासंदर्भात चर्चा केली तसेच तौफिक शेख यांनी सोलापूर शहरातील विकास त्याचबरोबर अल्पसंख्यांकांची सुरक्षा असे अनेक प्रश्न मांडले.
यावर उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याच बैठकीत सोलापूर शहरातील राजकीय विषयावर चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे याच्या प्रवेशासंदर्भातील अतिशय सकारात्मक चर्चा या दरम्यान करण्यात आली. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात मोठा मेळावा घेऊन दोन्ही नेत्यांचा आपल्या हजारो समर्थकांसह प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
एक आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा आणि दुसरा अल्पसंख्यांक समाजातील लोकप्रिय चेहरा पक्षात आल्याने पक्ष मजबूत तर होईलच,आगामी लोकसभा,विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत चांगल्या मतामध्ये रूपांतर होईल असे मत शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, आदनान शेख ,राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी नगरसेवक गणेश पुजारी ,इरफान शेख, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम,विशाल बंगाळे आदी उपस्थित होते.