पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून रे नगर येथील गृह प्रकल्प व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
*पालकमंत्र्यांच्या हस्ते रेनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन
बँकांनी सिबिल खराब असल्याने गृह कर्ज नाकारलेल्या 2 हजार 100 लाभार्थ्यांना गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाणार
सोलापूर, दिनांक 14:- रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार गृहप्रकल्पातील कामाचा तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, खासदार जय सिध्देश्वर महास्वामी, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल तेली-उगले, शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, रे नगर फेडरेशन चे प्रवर्तक नरसय्या आडम, अपर जिल्हाधिकारी प्रशांत ठोंबरे, रेनगरचे चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, ठेकेदार अंकुर पंधे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा गृह प्रकल्प जगातील सर्वात मोठा गृह प्रकल्प असून यातून तीस हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या घरकुल वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी व नागरिक यांना ने -आण करण्यासाठी रे नगर फेडरेशन यांनी योग्य नियोजन करावे. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. घरकुल वितरणाचा कार्यक्रम शांततेत पार पडेल यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व रे नगर प्रकल्पाचे संबंधित यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी पार पडेल याची दक्षता घ्यावी असेही त्यांना सूचित केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. त्याप्रमाणेच माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅड च्या जागेची व तेथील कामाची पाहणी करून पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात येत असलेल्या सभा ठिकाणची पाहणी करून व्यासपीठ तसेच किती नागरिक सभामंडपात बसू शकतात या अनुषंगाने माहिती घेऊन येणाऱ्या नागरिकांना येताना जागेवरच नाष्टा व पाण्याची सोय तसेच येथून जाताना फूड पॅकेट देण्याचे नियोजन करावे असेही त्यांनी सुचित केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी व विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सर्व संबंधित यंत्रणेला कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी सुरक्षा व कायदा व्यवस्थेच्या दृष्टीने माहिती दिली. रे नगर प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनी ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूचना मांडल्या.
ठेकेदार अंकुर पंधे यांनी रे नगर येथील गृह प्रकल्पाचे सविस्तर माहिती दिली. हा प्रकल्प 365 एकर जागेवर होत असून 30 हजार घरकुले निर्माण केली जात आहेत. एका घरकुलाची किंमत पाच लाख रुपये इतकी असून 300 चौरस फूट एवढी घरकुलाची जागा असून अडीच लाख रुपये लाभार्थी व अडीच लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 831 कोटी असून यातील लाभार्थी हिस्सा 750 कोटीचा असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पाची भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झालेले होते तर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुले पूर्ण झालेली असून वितरण दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन-
रे नगर येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली असून येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा झालेला आहे. या पाणीपुरवठा योजनेची चाचणी पूर्ण झालेली असून आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले.
2100 लाभार्थ्यांना गृह कर्ज उपलब्ध करणार-
ज्या लाभार्थ्यांचे सिबिल खराब असल्याने बँकेने गृह कर्ज प्रकरणे नामंजूर केली आहेत अशा 2100 लाभार्थ्यांना गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, रोजगार निर्मिती, वीज पुरवठा, सोलार एनर्जी प्रकल्प, अंगणवाडी, शाळा, वाहतूक व्यवस्था या बाबींचा सविस्तर आढावा श्री. पाटील यांनी घेऊन संबंधित यंत्रणेला मार्गदर्शक सूचना दिल्या.