मुंबई :- भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली. तसेच भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले. मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह, त्याचे सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम् दुबे, प्रशिक्षक पारस म्हाब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. खचाखच भरलेले हे मध्यवर्ती सभागृह आज क्रिकेटच्या जल्लोषाने दणाणून गेले. भारतीय राष्ट्रध्वज उंचावून सभागृहात भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणाही घुमल्या. ‘…हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला या क्रिकेटमधीलच विक्रमादित्य लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाण्याने आणि हिंदी चित्रपट “चक दे इंडिया..!’ च्या जल्लोषी सुरांनी सभागृह सुरुवातीपासूनच निनादून गेले. यातच टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांचं आगमन होताच सभागृहातील घोषणा आणखी टिपेला पोहोचल्या.
या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार अॅड. आशिष शेलार, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला हरवलं तेव्हाच आपण अर्धा विश्वचषक जिंकला. सुर्यकुमार यादव च्या अजरामर झेलमुळे आपण विश्वचषक जिंकला आणि देशभरात गेले आठवडाभर जल्लोष सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केले आहे. या विजयामुळे देशवासियांचा, देशाचा गौरव झाला आहे, या भावनाने भारतीय संघाचे स्वागत करत आहेत. याचसाठी काल विजेत्या संघाच्या स्वागतासाठी मुंबईत अरबी समुद्राच्या शेजारीच जनसागर उसळला होता. आपल्या या संघाने भारतच क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे सिद्ध केले आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. आपले वारकरी विठ्ठलच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. तर काल क्रिकेटप्रेमी वारकरी याच भावनेने मुंबईकडे आले आहोते. मुंबईत दिवाळी-दसराच साजरा झाला. भारतीय संघात मुंबईकर चार खेळाडू आहेत. कर्णधार रोहीत शर्मासह, सूर्यकुमार हे विजयाचे शिल्पकार आहेत याचा सर्वांनाच अभिमान आहे. विशेष म्हणजे एकही सामना न हारता, या संघांने विश्वचषक जिंकला आहे, ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भारतीय संघातील मुंबईतील अनेक दिग्गज आणि महान क्रिकेटपटूंचा समावेश असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, 1983 चा विश्वचषक आपण कपिल देव यांनी घेतलेल्या त्या एका झेलमुळे जिंकलो होतो. कपिल देव यांचा तो झेल आणि सुर्यकुमार यादव यांचा या स्पर्धेतील झेल हा भारतीयांसाठी अजरामर क्षण ठरला आहे. हे विश्वविजेतेपद प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतिक आहे. या मुंबईकर खेळाडूंनी आपल्या नावाप्रमाणेच भारताची विजयी पताका जगात फडकवली आहे. त्यांनी यापुढेही भारतीयांना असाच आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळवून द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आणला आहे. एका अपराजित संघाने विश्वचषक जिंकला आहे. रोहीत शर्मांनी अद्वितीय कामगिरी करत, भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांच्या मांदियाळीत स्थान पटकावले आहे. रोहित यांनी कपिल देव, महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर आपला नावलौकीक केला आहे. कर्णधार म्हणून रोहित यांनी संघातील सहकाऱ्यांचा जिंकलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्यांची नेतृत्व शैली ही भारतीय संघाच्या कर्णधाराची परंपरा राखणारी आहे. मुंबईकर हे सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान असल्याचेही सांगून आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईत 1 लाखापेक्षा जास्त क्षमतेचे आधुनिक स्टेडियम बांधण्याची सूचना त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी केलेली गर्दी अभूतपूर्व होती. मात्र मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही, त्यामुळे त्यांनी मुंबईकराचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की विधानभवनात असा दिमाखदार समारंभ होतो आहे, याचे मोठे समाधान आहे. चमत्कार घडेल असे वाटत होते आणि चमत्कार घडला. आपला क्रीडा रसिक आगळावेगळा आहे. मरिन ड्राईव्हला अभूतपूर्व गर्दी झाली होती. भारतीय लोक क्रिकेटवर प्रेम करतात, असे प्रेम जगात कुठेही दिसत नाही. यात अमेरिकासारखा संघही आता पुढे आला आहे. सूर्यकुमार यांचा झेल हा अप्रतिमच होता. यापुढे रोहित टी-20 खेळणार नाही.पण यापुढे ज्या-ज्यावेळी आपण टी-20 पाहू, त्यावेळी रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाने प्रत्येकाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला. क्रिकेटमुळे विधिमंडळ कामकाज करतांनाही मदत होते, असे सांगत त्यांनी विधिमंडळातर्फे खेळाडूंना शुभेच्छा देऊन आगामी काळात गौरवशाली क्षण मिळवून देण्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विधानभवनात प्रथमच अशाप्रकारचा कार्यक्रम होत आहे. हा सोहळा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने होणारा सत्कार होता. खेळाडूंच्या विजयासाठी प्रत्येक नागरिकाने शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. या अभूतपूर्व विजयानंतर क्रिकेटसह सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी एकत्र यावे, असेही आवाहन उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह खेळाडूंचे वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅाफी, विधानमंडळाचे स्मृतीचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या सत्कार सोहळ्याने आनंदीत झालो आहोत. काल आणि आज झालेले स्वागत आम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. मुंबई पोलिसांनी केलेले नियोजन अप्रतिम होते. विश्वकरंडक जिंकणे हे आमचे स्वप्न होते. सर्व खेळाडूंनी बजावलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे हा करंडक जिंकता आला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले.