आठ जणांचा होणार श्रीकाशीमहापीठाकडून गौरव
MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : श्री जगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन, जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा पुरस्कार सोहळा शनिवार दि. २७ जुलै रोजी सांयकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे होणार असल्याची माहिती डॉ. अनिल सर्जे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते व श्रीकाशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दहा हजार रुपये रोख रक्कम, गौरवपत्र, रुद्राक्ष माळ, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पत्रकार परिषदेस सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, बाबुराव मैदर्गीकर, रेवणसिद्ध वाडकर, राजशेखर बुरकुले, विद्यानंद स्वामी, चिदानंद मुस्तारे, सचिन विभूते उपस्थित होते.
यांना जाहीर झाले पुरस्कार
डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार डॉ. वेदप्रकाश डोणगावकर-मठवाले (वाशिम), वे. मू. वीरसंगय्या स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र बलसुरे (सोलापूर), वे. मू. सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार ऐश्वर्या कुलकर्णी (धाराशिव), वे.मू. बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार महेश स्वामी (पिंपरी चिंचवड, पुणे), विठाबाई देवाप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार व्याख्यान केसरी वे. मू. बसवराज शास्त्री-हिरेमठ (सोलापूर), श्री ष. ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार प्रा. भीमाशंकर मोतीपवळे चाकूरकर (लातूर), सिद्रामप्पा भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार गुरुनाथ वठारे (सोलापूर), शांताबाई व निवृत्ती गायकवाड (स्वकुळ साळी समाज) कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. डॉ. अनंत भाऊराव बिडवे (बार्शी)