मनोज जरांगे-पाटील यांनी सोलापूरच्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते घेतले पाणी..
महेश हणमे /9890440480
मराठा आरक्षणासाठी आणि राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला अंतरवाली सराटी या ठिकाणी बसलेले आहेत. गेल्या चार दिवसापासून पाणी आणि उपचाराशिवाय जरांगे पाटील उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली आहे.
आज बुधवारी सकाळी जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर उपोषण स्थळी येण्यासाठी मराठा समाज बांधवांची अक्षरशः रीघ लागली.
माझ्या नेत्याला नेमके काय झालं ..?
आरक्षणा इतकेच किंबहुना आरक्षणापेक्षा मराठा समाजाच्या या प्रामाणिक आणि कधीच मॅनेज न होणाऱ्या नेत्याला मृत्यूच्या दारात पाहून मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आणि आक्रमक झालेला असल्याचे चित्र समाजामध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
आज अंतरवाली सराटी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा तरुण ,महिलावर्ग ,लहान मुले जमा
झालेली आहेत.
दादा, थोडे तरी पाणी घ्या..!
दादा थोडे तरी पाणी घ्या अशी विनवणी महिला वर्ग डोळ्यात पाणी आणून करत होत्या. परंतु जरांगे पाटील यांनी त्यांना नकार दिलेला होता.
शेकडो महिला भगिनी अत्यंत विनवणी करून पाणी घेण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी जरांगे पाटील यांना विनंती करत होत्या.
वैद्यकीय उपचारास दिला होता नकार..
सिव्हिल सर्जन, डॉक्टर मंडळी हे मनोज जरांगे पाटील यांच्यावरील उपचारांसाठी सातत्याने विनंती करत होते ,परंतु उपचार घेण्यास पाटलांनी नकार दिला होता.
आज बुधवारी सकाळी सोलापुरातील सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, रवी मोहिते, ॲड.श्रीरंग लाळे,अनंत जाधव,डॉ.प्रमोद पाटील,प्रशांत भोसले आदी समाजबांधव मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तसेच काळजी घेण्याची विनंती करण्यासाठी उपोषणस्थळी पोहोचली.
सलाईन लावून घेतले..
आज दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास मराठा समाज बांधवांनी केलेल्या आग्रहामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावून घेतले.
त्यानंतर मात्र प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर आगपाखड केली.
अखेरीस विनंतीला दिला मान…
सातत्याने खालावत जाणारी प्रकृती ,होणारी प्रचंड चिडचिड हे पाण्याविना आणि उपचाराविना केलेल्या उपोषणामुळे होत असल्याचे समाज बांधवांना लक्षात आले. सकल मराठा समाजाच्या मुख्य समन्वयकांची तातडीची बैठक पार पडली.
या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत जरांगे पाटील यांची प्रकृती सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरक्षणाच्या लढ्यातील या सेनापती जगला पाहिजे यासाठी मराठा समाजातील मुख्य समन्वयकांनी जरांगे पाटील यांनी किमान पाणी तरी घ्यावे यावर ठाम भूमिका घेतली.
यावर सोलापुरातील सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार,रवी मोहिते यांनी पुढाकार घेवून उपोषणस्थळी बसलेल्या जरांगे पाटील यांना राज्य पातळीवर चळवळ सध्या कशा पद्धतीने काम करत आहे याची सविस्तर माहिती देऊन पाणी घेण्याची विनंती केली.
कोणी कितीही विरोध केला तरी मराठा समाज सक्षमतेने त्याला उत्तर देण्यासाठी तयार असल्याची ग्वाही जरांगे पाटलांना दिली. अखेरीस समाज तुमचा मान ठेवतो तुम्ही समाजाचा मान ठेवणे गरजेचे आहे हे सांगितल्यावर जरांगे पाटील यांनी रवी मोहिते व इतर समाज बांधवांच्या हस्ते पाणी घेतले. यावेळी उपस्थित असलेल्या मराठा समाजाने यावेळी मोठा जल्लोष करून आनंद व्यक्त केला. यावेळी पाटील आपण घेतलेला घोटभर पाण्याचा समाज ऋणी असेल अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली यावेळी ॲड.श्रीरंग लाळे,अनंत जाधव,डॉ.प्रमोद पाटील,प्रशांत भोसले यांच्यासह मुंबई , अंतरवाली सराटी येथील मुख्य समन्वयक उपस्थित होते.