MH 13 News Network
सुनील देवधर यांचे बुधवारी ‘अखंड भारत’ या विषयावर व्याख्यान
शिवस्मारकतर्फे आयोजन
सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक) तर्फे बुधवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात माय होम इंडिया या देशीव्यापी सामाजिक संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांचे ‘अखंड भारत’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी दिली.
श्री. बंकापूर म्हणाले, १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली. इ. स. ७११ च्या मोहम्मद बिन कासिमच्या हिंदुस्थानवरील पहिल्या आक्रमणानंतर परमपूजनीय भारतमातेवर होणाऱ्या आघातांची मालिका सुरू झाली. १९१९ मध्ये अफगाणिस्तान तर १९४७ मध्ये पाकिस्तान भारतापासून तुटला.
कन्याकुमारी ते काश्मीर आणि ब्रह्मदेश ते बलुचिस्तान असा अखंड भारत पुन्हा एकदा निर्माण करणे हे सर्वांचेच ध्येय आहे. याच ध्येयपूर्तीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिन साजरा करून या निर्धाराची जाणीवरुपी ज्योत आपल्या मनात पुन्हा एकदा प्रज्वलित करणे आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याहीवर्षी अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त माय होम इंडिया या देशव्यापी संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अत्यंत अभ्यासू, प्रखर आणि देव – देश – धर्मनिष्ठ मांडणी करणाऱ्या सुनील देवधर यांचा मोठा श्रोतावर्ग सोलापुरात आहे. विविध मंडळाच्या, संस्थेच्या, संघटनेच्या पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी तसेच समस्त सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानास हजेरी लावावी आणि व्याख्याते सुनील देवधर यांच्या अमोघ वाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी केले आहे.