MH 13News Network
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले.ते 86 वर्षांचे होते.
मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले होते.हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे निदान झाले.
त्यानंतर मनोहर जोशी यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3.02 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे शिवसैनिक होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे
मनोहर जोशी… थोडक्यात..!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली होती. शिवसेनेकडून जोशी यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले होते.
१९९५मध्ये शिवसेना भा.ज.पा. युतीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती.
मागील काही काळापासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते.
जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम,
रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
माजी मुख्यमंत्री,माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्यावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.मागील वर्षी मनोहर जोशी यांनी मोठ्या आजारावर जिद्दीने मात केली होती.