MH 13 News Network
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेला दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर झाली आहे.आज (२७ ऑक्टो) रात्री उमेदवारी जाहीर झाल्याचे पत्र काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे.
महाविकास आघाडी मधून काँग्रेसच्या उमेदवारी साठी धर्मराज काडादी, दिलीप माने, सुरेश हसापुरे ,बाबा मिस्त्री यांच्यासह 24 जणांपेक्षा जास्त जणांनी फिल्डिंग लावली होती.
यात दिलीप माने यांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिल्याचे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले होते.
दक्षिणेतील लढत आता रंगणार असून भाजपचे सुभाष देशमुख, काँग्रेसचे दिलीप माने, उद्धव ठाकरे गटाकडून अमर पाटील, मनसेकडून महादेव कोगनुरे, तर वंचित बहुजन आघाडी कडून संतोष पवार हे आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. तर परिवर्तन आघाडी कडून युवराज राठोड मैदानात उतरले आहेत.
यंदा तगडी फाईट होण्याचे चित्र दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. भाजपाचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्यासमोर दिलीप माने यांचे मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन मला एबी फॉर्म मिळाला असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे शरद कोळी, पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, अस्मिता गायकवाड यांच्यासह पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होते.
कालच सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांच्या समर्थकांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. तर एक दिवस आधीच दिलीप माने यांच्या घरासमोर फटाके उडवण्यात आले होते. दिलीप माने समर्थकांनी करू किंवा मरू..! पण दिलीप माने यांना आमदार करू अशी घोषणाबाजी केली होती. याची चर्चा संपूर्ण दिवसभर शहर आणि दक्षिण तालुक्यात सुरू होती.
दिलीप माने यांना उमेदवारी मिळण्यात खासदार प्रणिती शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.