बार्शी :- जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून पाच वेळा बार्शीत आमरण उपोषण करणारे आनंद काशीद यांनी अनोख्या पद्धतीने बार्शी विधानसभे करता उमेदवारी अर्ज दाखल केला.
डोक्यावर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची फुले पगडी, गळ्यामध्ये शिव शाहूंचा भगवा, हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हा सर्व विचार समाजामध्ये रुजावा याकरिता आपण बार्शी विधानसभेमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, असे काशीद यांनी अर्ज भरल्यानंतर बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाज त्याचबरोबर सर्व समाज बांधव यावेळी परिवर्तन केल्याशिवाय शांत राहणार नाहीत. गोरगरिबांची लेकरं सुधारण्यासाठी गोरगरिबांचा नेता हवा हा ठाम निर्धार मनामध्ये मतदाराने केलेला आहे.
त्यामुळे मतदार यावेळी विधानसभेला नवीन चेहरा देत जरांगे पाटलांच्या विचारांचा म्हणजे गोरगरिबांच्या हिताचे काम करणाराला निवडून देतील, यामध्ये कुठलीही शंका नाही. गोरगरिबांनीच मला उमेदवारी अर्ज भरण्याकरता प्रवृत्त केल्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे, असेही काशीद म्हणाले.