MH 13 News Network
रेल्वे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी उभारणार लढा ;मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे आश्वासन
सोलापूर : प्रतिनिधी रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे कर्मचारी संघातर्फे लढा उभारण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वे कर्मचारी संघातर्फे देण्यात आले. मध्य रेल्वे अंतर्गत होत असलेल्या कर्मचारी संघटनांच्या मान्यताप्राप्तीच्या निवडणुकीसाठी एमआरकेएसतर्फे दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.रेल्वे स्थानकापासून या फेरीचा प्रारंभ झाला. भारतमाता की जय, एक देश, एक संविधान, एक पेन्शन, वोट नहीं मौका है, ओपीएस को पाना है अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
ही दुचाकी फेरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर विसर्जित झाली.यावेळी मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे भगवंत कुलकर्णी म्हणाले, रेल्वे खात्याकडून सध्या घोषित करण्यात आलेल्या दोन्ही पेन्शन योजना निष्प्रभ आणि कामगारांना त्रासदायक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, महिलांसाठीच्या सोयींचा अभाव आहे.
या सर्व समस्यांवर उपाय म्हणून मध्य रेल्वे कर्मचारी संघ रेल्वे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे. त्याकरिता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एस. सी, एस. टी. संघटना, ओबीसी संघटना, ट्रॅकमन असोसिएशन, गॅंगमन असोसिएशन अशा एकूण १० संघटनांनी मध्य रेल्वे कर्मचारी संघाला पाठिंबा दिला आहे, असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. ४, ५, ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन नितेश उडाणशिव यांनी याप्रसंगी केले.
ऑल इंडिया एस.सी. एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे झोनल सचिव टी.बी. वाघमारे म्हणाले, मागील निवडणुकांमध्ये ऑल इंडिया एस.सी. एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज युनियनने नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाला पाठिंबा दिला होता. परंतु या दोन्ही संघटनांनी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही ठोस कृती केली नाही.
त्यामुळे मध्य रेल्वे कर्मचारी संघ ट्रेड युनियन मान्यता प्राप्त होण्याकरिता आम्ही पाठिंबा देत आहोत, असेही ऑल इंडिया एस.सी. एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे झोनल सचिव टी. बी. वाघमारे याप्रसंगी म्हणाले.याप्रसंगी नितेश उडाणशिव, रविंद्र नाशिककर, श्रीधर खेडगीकर, सुहास कुलकर्णी, प्रमोद जाखलेकर, रविंद्रयन आदी उपस्थित होते.