MH 13 News Network
सोलापूर- श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख दीपक कलढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे हे होते.
यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे व कलढोणे कुटुंबीय, आप्तेष्ट उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद खोबरे यांनी केले तर सत्कारमूर्तींचा परिचय प्रीती काळेगोरे यांनी करुन दिला.
यानंतर ‘गुरुकुल स्वरमंच ‘मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. २९ वर्षे ४ महिने सेवा पूर्ण करीत नियतवयोमानानुसार सेवानिवृत्तीप्रित्यर्थ दीपक कलढोणे व त्यांच्या सुविद्य पत्नी मनिषा कलढोणे यांचा प्रशाला व संस्थेतर्फे मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विभागाकडून व विद्यार्थी प्रतिनिधींनीही श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थिनी साक्षी रोकडे व शिक्षक प्रतिनिधी म्हणून राजेश मोहोळकर व तृप्ती दुर्गे यांनी दीपक कलढोणे यांच्या सेवाभावी वृत्तीचा परिचय करून दिला. याप्रसंगी कलढोणे यांची कन्या निरंजनी कलढोणे व त्यांच्या भगिनी ज्योती चोथे यांनी सत्कारमूर्तीच्या आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना दीपक कलढोणे यांनी स्व. श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या प्रति आदर व्यक्त केला आणि आपल्या नियुक्ती ते निवृत्तीपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी आपल्या मनोगतातून दीपक कलढोणे यांच्यासारखा संस्कारशील शिक्षक लाभणे हे भाग्य असल्याचे सांगत सत्कारमूर्तीना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिळ्ळे यांनी केले तर तेजस सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.