MH 13 NEWS NETWORK
गिरीकर्णिका फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांना यश – HPCLने दिला सकारात्मक प्रतिसाद, मंजुरी प्रक्रिया सुरू
सोलापूर दि.०१/०२/२०२५: सोलापूर शहरातील बाळे परिसरात पेट्रोल पंपाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. जवळपास २ लाख लोकसंख्या असलेल्या या भागात इंधन भरण्यासाठी नागरिकांना लांब अंतर प्रवास करावा लागत होता. यामुळे वेळेचा अपव्यय, आर्थिक बोजा आणि आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होत होत्या.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदिपसिंग पुरी यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) बाळे परिसरात कंपनी मालकीचा, कंपनीद्वारा चालवला जाणारा (Company Owned, Company Operated – COCO) पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
HPCLच्या सोलापूर प्रादेशिक कार्यालयाकडून दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी पाठवलेल्या अधिकृत पत्रानुसार, कंपनीने या मागणीची दखल घेतली असून संबंधित प्रकल्प मंजुरी प्रक्रियेत आहे.
बाळे परिसरात पेट्रोल पंप उभारणी का महत्त्वाची?
१. लोकसंख्येची वाढ – बाळे हा सोलापूरच्या जलद वाढणाऱ्या भागांपैकी एक असून, येथे लाखोंची लोकसंख्या आहे.
२. वाहतूक व आपत्कालीन सेवा – इंधनाची सहज उपलब्धता नसल्याने रुग्णवाहिका, पोलिस गाड्या आणि अन्य आपत्कालीन सेवांना विलंब होतो.
३. वेळ आणि इंधन बचत – लांब प्रवास टाळल्याने नागरिकांचा वेळ आणि इंधन वाचेल, आर्थिक बचत होईल.
गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करत “सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे सांगितले.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बाळे परिसरातील नागरिकांनी गिरीकर्णिका फाउंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, “पेट्रोल पंप उभारल्याने आमच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होईल,” असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त करत आहेत.
आता केवळ औपचारिक मंजुरी आणि नियामक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच बाळे परिसरात पेट्रोल पंप उभारणी सुरू होईल. हा निर्णय गिरीकर्णिका फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांचे फलित असून, यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.