नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप
अति. जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूरचा निर्णय..
सोलापूर – नई जिंदगी चौकामध्ये भरदिवसा झालेल्या खून प्रकरणात आरोपी मुस्ताक नासीर पटेल (वय 36, रा. सिद्धेश्वर नगर, भाग-4) यास अति. जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सोलापुरातील सुप्रसिद्ध विधीज्ञ प्रदीपसिंग राजपूत यांच्या कारकिर्दीतील तब्बल 110 वी जन्मठेपेची शिक्षा सुनावणारे हे न्यायालयीन प्रकरण आहे.
हा निर्णय मा. श्री. प्रशांत पी. राजवैद्य, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांनी दिला. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये आरोपीस चार महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
निकाल दिनांक – 28 नोव्हेंबर 2025
खटल्याची पार्श्वभूमी…
फिर्यादी अलिमोददीन शमशोददीन पटेल, रा. गज्जम नगर, नई जिंदगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
मृत व्यक्तीचे नाव शकिल शमशोददीन पटेल असून तो फिर्यादीचा भाऊ आहे.दि. 12 जून 2020 रोजी सकाळी 10.45 च्या सुमारास अमन चौक–मजरेवाडी रोडवरील पठाण हॉटेलसमोर आरोपी मुस्ताक पटेल व मृत शकिल पटेल यांच्यात वाद झाला.
“आपण आमच्या मुलांवर खोटे केस करता काय?” असा सवाल मृताने करताच आरोपी संतापून कमरेत ठेवलेला चाकू काढला आणि छाती, पोट, हात व पाठीवर असे एकूण 11 वार करून शकिलचा खून केला.

गुन्ह्यानंतर आरोपीने चाकू गटारात फेकून घटनास्थळाहून पलायन केले. नंतर तो स्वतःहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला.

तपास आणि सुनावणी…
तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी केला, तर कोर्ट पैरवी श्रीमती एस. एस. घाडगे, महिला पो.हवालदार यांनी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी काम पाहिले. आरोपीचा बचाव ॲड. यू. डी. जहागीरदार यांनी केला.सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा भक्कम असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या प्रकरणात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, घटनास्थळी सापडलेले रक्ताचे डाग, जवळच आढळलेला चाकू, तसेच आरोपी व मयताच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने..
हे सर्व पुरावे फॉरेन्सिक अहवालात गुन्ह्याशी पूर्णपणे सुसंगत आढळले. शवविच्छेदनात मयताच्या अंगावर 11 चाकूच्या जखमा असल्याचे नमूद आहे.
न्यायालयाचा निष्कर्ष…
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी मुस्ताक नासीर पटेल यानेच नई जिंदगी चौकात शकिल पटेल याचा खून केल्याचे ठामपणे नमूद केले आणि त्यास जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली.








