अक्कलकोट बंदची हाक: प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध
हा हल्ला पुरोगामी विचारांवर असून, बहुजन चळवळीचा प्रतिकार – माऊली पवार
अक्कलकोट, दि. १६ (प्रतिनिधी):
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेला भ्याड हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे, तर संपूर्ण पुरोगामी विचारसरणीवरचा प्रतिगामी हल्ला असल्याचे मत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी व्यक्त केले. या हल्ल्याचा निषेध म्हणून येत्या १८ जुलै रोजी (शुक्रवार) अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली असून बंद दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या रविवारी गायकवाड यांच्यावर शाई फेकून व अंगावर वंगण टाकण्याचा हल्ला करण्यात आला. या घटनेविरोधात बुधवारी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बंदला व्यापक पाठिंबा..
या बंदमध्ये सोलापूर जिल्हा व शहरातील सर्व बहुजन संघटना, विविध चळवळीतील नेते, आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बंद काळात शाळा, महाविद्यालये, दुकाने व अन्य व्यवहार पूर्णतः बंद राहतील. मात्र, केवळ दवाखाने व मेडिकलसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
सन्मान सोहळ्याची घोषणाही..

“गायकवाड यांच्यावर ज्या चौकात हल्ला झाला, त्याच चौकात त्यांचा भव्य नागरी सन्मान करून विचारांचा विजय साजरा करण्यात येईल,” असे ठाम वक्तव्य माऊली पवार यांनी यावेळी केले.
‘बदनामीचे षड्यंत्र’ असल्याचा आरोप
मराठा सेवा संघाचे राम गायकवाड व इतर वक्त्यांनी हा हल्ला आणि त्यानंतर सुरु झालेली चर्चा ही नियोजित बदनामी असल्याचा आरोप केला. “कार्यक्रम हे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्यातर्फे आयोजित होता, तरीही अन्नछत्र मंडळाचे जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अमोलराजे भोसले यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले,” असे ते म्हणाले. या षड्यंत्राचा तपास होण्याची मागणी त्यांनी केली.
एकतेचा निर्धार..
या बैठकीस पुरुषोत्तम बरडे, नाना काळे, राजन जाधव, राम गायकवाड, बाळासाहेब मोरे, अरुण जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, अॅड. सुरेशचंद्र सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस नेते अशपाक बळोरगी, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी एजाज मुतवल्ली व शाकीर पटेल यांनी देखील बंदला पाठिंबा दर्शविला.
“बदनामीचे षड्यंत्र”:
“जो योद्धा शरण जात नाही, त्याच्याविरुद्ध बदनामीचा डाव रचला जातो,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आज जनमेजयराजे आणि अमोलराजे भोसले यांच्यावर अशाच प्रकारचा डाव आखला जात असल्याचे वक्त्यांचे म्हणणे आहे.
“ज्या चौकात हल्ला, त्याच ठिकाणी सन्मान!”
गायकवाड यांच्यावर हल्ला झालेल्याच चौकात नागरी सत्काराचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार असून, विचारांची लढाई विचारांनीच लढण्यात येईल, असा संदेश माऊली पवार यांनी दिला.