MH 13News Network
ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना, ॲट्रॉसिटीची परवानगी द्या ; शासनाकडे केली मागणी
कुणाच्याही अध्यात- मध्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जात आहे. तसेच या समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जात आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजातील व्यक्तीस शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सदरचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
राज्यात सध्या समाजात दुहीचे विष पेरून असंतोष पसरवण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु ब्राह्मण समाज हा मुख्यतः बुद्धिजीवी आणि शांतता प्रिय समाज आहे. तमाम जनतेच्या हितासाठी ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींनी तन-मन-धनाने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उत्तम सेवा केली आहे आणि करतही आहे. तसेच या समाजातील कोणाही व्यक्तीने कोणत्याही समाजास कसल्याही प्रकारे नुकसान पोहोचविलेले नाही. ब्राह्मण समाज कोणत्याही शासकीय सेवा सुविधा उपलब्ध नसतानाही स्वतःच्या बुद्धीच्या जीवावर प्रगती करत आलेला आहे, अशी वस्तुस्थिती असतानाही इतर समाजातील काही व्यक्ती व संघटना अल्पसंख्य असणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ब्राह्मण समाजास धमकावणी देत आहे. परवाच घडलेल्या जाहीर भाषणाच्या एका कार्यक्रमात बारामती तालुक्यातील सरपंच कीचक नवले यांनी तीन मिनिटात अख्खे महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपवू अशी धमकीची भाषा वापरलेली आहे व हा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर योगेश सावंत यांनी प्रसारित केला आहे. अशा प्रकारच्या विविध समाजकंटक व्यक्ती आणि संघटनांकडून ब्राह्मण समाजास विनाकारण लक्ष केले जात असून त्यामुळे ब्राह्मण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्राह्मण समाजाने सन्मार्गाने कमविलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील यामुळे नष्ट होईल की काय अशी भीती समाजात निर्माण झाली आहे. अशा वारंवार घडणाऱ्या धमकावणीच्या भाषेमुळे कोणत्याही सरकारने त्या समाजकंटक व्यक्तीस अथवा संघटनांविरुद्ध कसलीही कायदेशीर कारवाई करून अशा स्वरूपाच्या समाजघातक प्रवृत्तींना जरब बसविण्याचा प्रयत्न केलेला नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे निवेदन आम्ही आपणास देत असल्याचा उल्लेख निवेदनात केलेला आहे.
या निवेदनाद्वारे ब्राह्मण समाजातील व्यक्तींना स्वसंरक्षणार्थ व त्याच्या मालमत्तेच्या संरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवानासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना विशेष बाब म्हणून तातडीने परवाने देण्यात यावेत, ब्राह्मण समाजाविरुद्ध विनाकारण जातीवाचक उद्गार काढून शिवीगाळ व धमकीची भाषा वापरणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था करण्यात यावी व त्या दृष्टीने शासकीय स्तरावरून योग्य ते आदेश तातडीने देण्यात यावेत, ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, विविध हिंदू धार्मिक स्थळांमध्ये पूजाविधी आणि मंत्रविधी करणाऱ्या तमाम पुरोहित वर्गास शासनामार्फत मासिक मानधन देण्यात यावे, ब्राह्मण समाजातील गरीब विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक आणि आर्थिक मदत करण्यात यावी. या मागण्याचे निवेदन सादर करताना पंचांगकर्ते मोहनशास्त्री दाते, जयंत फडके गुरुजी, रामचंद्र तळवळकर, दत्तात्रय आराध्ये, अमृता गोसावी, अमर कुलकर्णी, सुहास देशपांडे, मीनाताई चाटी, संपदा जोशी, भारती देशक गोविंद गवई, प्रमोद गोसावी, घन: श्याम दायमा, किरण करमरकर, दत्तराज कुलकर्णी, वामन कुलकर्णी, मुकुंद मुळेगावकर, विक्रम डोनसळे, डी.डी. कुलकर्णी, यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या.