mh 13 news network
सोलापूर, दि. 12- ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यांच्या चरित्रातील महत्त्वपूर्ण घटना असलेल्या श्रीगिरी पर्वतावरील कमरी कोळ्ळ (दरी) येथे घडलेल्या बालक सिध्दरामेश्वर आणि श्रीशैल मल्लिकार्जुन यांच्या भेटीचा प्रसंग असलेला कमरीकोळ्ळ पुतळा सिध्दरामेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आला आहे. श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्तांनी या पुतळ्याची पाहणी केली.





आपले आराध्य दैवत मल्लिकार्जुन यांच्या भेटीच्या ओढीने बालक सिध्दराम श्रीगिरी -श्रीशैल पर्वतावर गेले. परंतु, साकार रूपात मल्लिकार्जुन देवास सदेह भेटण्यासाठी त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, मल्लिकार्जुन भेटले नाही. अखेर मल्लय्या मल्लय्या अशी आर्त हाक देत बालक सिध्दराम श्रीशैल डोंगरावरून कमरी दरीत उडी घेत असतानाच साक्षात मल्लिकार्जुन देवाने अलगद उचलल्याची कथा सिध्दरामेश्वरांच्या चरित्रात प्रसिध्द आहे.



या प्रसंगाचा फायबरचा पुतळा सिध्दरामेश्वर तलावात उभारण्यात आला आहे. तलावातील पाणी आणि भोवताली पसरलेल्या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर हा शुभ्र पांढर्या रंगातील हा भव्य पुतळा सिध्दरामेश्वर भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे. सेल्फी पाईंट म्हणून भाविकांची पसंती मिळणार आहे.









