MH 13 News Network
उत्तर सोलापूर मधील बाळे भागात अनेक नागरी वसाहतीमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून जागोजागी खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य झाले आहे. पावसाळ्यामुळे दलदल वाढत असून समस्या दूर करण्यासाठी मुरूम टाकण्याची मागणी भाजपाच्या वतीने आज शुक्रवारी (२६ जुलै)मनपा आयुक्तांना करण्यात आली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व सलग तीन-चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली नसल्याने प्रभाग पाच मध्ये चिखल आणि दलदल वाढली आहे. शाळकरी मुले, वयोवृद्ध लोकांना विशेष म्हणजे महिला वर्गाला चिखलातून अक्षरशः वाट शोधावी लागत आहे.
चिखल आणि पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून घाणीचे साम्राज्य वाढले आहे. डेंगू सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
बाळे भाग हा हद्दवाढ भाग असल्याने प्रशासनाचे तिकडे दुर्लक्ष होत आहे .येथील लोक शंभर टक्के टॅक्स भरतात. तरीदेखील अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर निवेदनातील नमूद केलेल्या ठिकाणी मुरूम टाकावा आणि नागरिकांची गैरसोय टाळावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनामध्ये नंदीमठ नगर, अंबिका नगर, तोडकरी वस्ती, राजेश्वरी नगर,शिवाजीनगर, शिवाजीनगर तांडा, पद्मावती नगर, साईनगर,आकाश नगर, संतोष नगर, लक्ष्मी नगर,शिवशक्ती नगर, केगाव ,गजानन पार्क, गणेश नगर मडकी वस्ती या रहिवासी वस्तीचा समावेश आहे. या परिसरामध्ये मुरूम टाकून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रभाग पाच मधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या समस्या संदर्भातील निवेदन भाजपा नेते राजू आलुरे, विनय ढेपे, आनंद भवर, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर,अमोल झाडगे ,यतिराज पांढरे,विशाल यांच्या शिष्टमंडळांनी नगर अभियंता सारिका आकुलवार यांना दिले.
मुरुमच्या प्रतीक्षेत रहिवासी आणि झोन कार्यालय..
पावसाळा आला की रहिवासी वस्ती मधून चिखलावर समस्या म्हणून मुरूम गाड्यांची मागणी केली जाते.सद्यस्थितीत महापालिकेवर प्रशासक असून माजी नगरसेवकांना आणि नेते मंडळींना झोन कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. झोन क्रमांक एकचे मेंटेनन्स बजेट संपलेले असून मुरूम टाकण्यासाठी हतबलता दर्शवण्यात आली आहे. यासंदर्भात आज शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मंजूर मक्तेदारांना मुरूम टाकण्यासाठी सांगण्यात आलेले असले तरी रॉयल्टी मोठ्या प्रमाणावर द्यावी लागते. त्यामुळे व्यवसायाचे गणित बिघडत असल्याने महापालिकेकडे असणारे शेकडो ठेकेदार, मक्तेदार मुरूम टाकण्यासाठी तयार होत नाहीत. अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुरूम नसल्याने चिखलाचे आणि दलदलीचे साम्राज्य झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
नगर अभियंत्यांची प्रतिक्रिया
महापालिका आयुक्त या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत शहरात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे हे निवेदन मी स्वीकारले आहे. मुरूमबाबत किंवा बजेट बाबत मी निर्णय घेऊ शकत नाही. विभाग प्रमुख आयुक्तांकडे नागरिकांच्या समस्या विषयीचे भाजपाचे निवेदन सोमवारी देण्यात येईल.
सारिका आकुलवार
नगर अभियंता
आमदारांच्या विकास निधी मधून मोठ्या प्रमाणावर शेळगी व बाळे भागात कामे झाली आहेत. परंतु मेंटेनन्स कामाची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आणि झोनची आहे. हद्दवाढ भागातील नागरिक शंभर टक्के टॅक्स भरतात. तरी देखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर समस्या दूर कराव्या अन्यथा महापालिकेवर स्थानिक नागरिकांसह हलगी मोर्चा काढावा लागेल.
राजू आलूरे
भाजप नेता