MH 13 News Network
सोलापूर शहर परिसरात काही ठिकाणी कावळे, बगळे,घारी यांची अचानक मरतूक झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले. मृत पक्षांची तपासणी केल्यानंतर बर्ड फ्लू असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. आज शुक्रवारी सकाळी बाळे येथील राजेश्वरी नगर भागात मृत कावळे आढळून आले आहेत. या भागातील प्राणी मित्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर, भुईकोट किल्ला परिसर, पार्क चौपाटी, रेल्वे स्टेशन परिसर ( महापौर बंगल्याजवळील भाग) या ठिकाणी मृत पक्षी आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने सतर्कता दाखवत अलर्ट झोन जाहीर केला.

या भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. सोबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
बाळे भागातील बार्शी रोडवर असलेल्या राजेश्वरी नगर येथील नागनाथ मंदिराजवळ कावळे मृत अवस्थेत मिळून आले आहेत. एक मृत कावळा कुत्र्याने घेऊन गेल्याचे समजते.
रस्ताच नाही तर झाडू कुठे मारायचा..?
राजेश्वरी नगर भागातील रस्ता अतिशय खराब असल्यामुळे येथील स्वच्छता केली जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून रस्ताच नसल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी झाडूकामासाठी या भागात फिरत नाहीत. परिणामी, संबंधित खात्याशी संलग्न स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी नसल्यामुळे शास्त्रीय पद्धतीने या कावळ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मृत कावळ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सोमवारी महापौर बंगल्याच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मच्छी मार्केट, फॉरेस्ट भागात काही कावळे मरून पडलेले दिसून आले. सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी तातडीने या ठिकाणची पाहणी करून संबंधित खात्याला आदेश दिले. लागलीच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी दुपारी तातडीच्या बैठकीत संबंधित खात्याला सूचना देऊन आदेश लागू केले आहेत.
बर्ड फ्लूमुळे चिकन विक्रेत्यांवर संक्रात..
ज्या भागात बर्ड फ्लू चा धोका आढळून आला आहे. त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून मांस विक्री करणारी दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच मांस विक्री करणाऱ्या ठिकाणच्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.
मृत पक्षाला नागरिकांनी हात लावू नये..
मृत पक्षाला नागरिकांनी हात लावू नये अशा सूचना संबंधित प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. मृत पक्षाची विल्हेवाट लावण्याची शास्त्रीय पद्धत असून संबंधित खात्याचे कर्मचारी पीपीई किट घालून काम करत असतात. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.