अर्थसंकल्पात जलयुक्त शिवार अभियान-२ करिता ६५० कोटी रुपयांचा निधी
: शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, महिला सक्षमीकरण, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. जलयुक्त शिवार अभियान-2.0 साठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पाचा जनतेला लाभ होणार आहे, त्याबद्दल शासनाचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आभार मानले आहेत.
जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण झाली असून या आर्थिक वर्षासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 338 जलाशयातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. लोकसहभागातून आतापर्यंत 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला असल्याचेही अर्थसंकल्पात सादर करण्यात आले आहे, असेही मंत्री राठोड यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीद्वारे महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश असल्याचे मंत्री श्री. राठोड म्हणाले