MH 13 NEWS NETWORK
विभागीय निमंत्रित पुरुष गट खो खो स्पर्धेत
सलामीच्या सामन्यात धाराशिवच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने ओगलेवाडी स्पोर्ट्स क्लब साताराचा १७- १३ असा डावाने पराभव केला. मध्यंतरासच धाराशिवने १७-७ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. धाराशिवकडून विजय शिंदे याने ( १.५० मि. व ६ गुण )अष्टपैलू खेळ केला. रवी वसावे (१.४०) व सचिन पवार (१.३०, १.५०) यानी संरक्षणाची बाजू सांभाळली. साताराकडून सुमित शिरतोडे याने १.२० मिनिटे संरक्षण व दुर्वक चंदगुडे याने दोन गडी बाद केले.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी, महाराष्ट्र खो खो असोसिएशन व सोलापूर खो खो असोसिएशन यांच्या वतीने रविवार २ मार्च रोजी विभागीय निमंत्रित खो खो स्पर्धेचे शानदार उदघाटन संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ चंद्रजीत जाधव व साई डेव्हलपर्सचे सतीश अंधारे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ एस एस गोरे होते. यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ सी एस मोरे, श्री. व्ही एस पाटील, डॉ दिलीप मोहिते, अश्विनी शिंदे, अजितकुमार संगवे, प्रविण बागल, डॉ एस एम लांडगे,डॉ एस एस मारकड आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा २ ते ४ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यात सातारा, सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातील आठ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये २१ हजार, द्वितीय क्रमांकास रुपये १५ हजार व तृतीय क्रमांकास रुपये ११हजार रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे.
यावेळी डॉ चंद्रजीत जाधव यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, खो खो हा भारतीय मातीतला खेळ आहे. या खेळातून अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले आहेत. बार्शीसारख्या ग्रामीण भागात खो खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. यातून खेळाडूंनी आपली क्रीडा कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन त्यांनी केले.
उदघाटक जयकुमार शितोळे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कर्मवीर मामांच्या शिक्षण व क्रीडा संकुलात खेळाडूंना अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते चांगली कामगिरी करतात. जिद्द, चिकाटी व शिस्तीच्या माध्यमातून स्पर्धेत यशस्वी व्हा असे त्यांनी खेळाडूंना सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी उपस्थित खेळाडूंचे स्वागत केले. ते म्हणाले, कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. बौद्धिक संपादन बरोबरच क्रीडा व खेळ विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाचे आहेत.सद्यस्थितीत क्रीडा व खेळाकडे विद्यार्थी आकर्षित व्हावेत यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहेत असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा सचिव डॉ एस एस मारकड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ एम व्ही मते यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार बी पी एड विभाग प्रमुख डॉ ए जी कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता सुरवसे व प्रा. पी पी नरळे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी एम पी एड विभाग प्रमुख डॉ एस एम लांडगे,बी पी एड विभाग प्रमुख डॉ ए जी कांबळे, बी एड विभाग प्रमुख डॉ व्ही पी शिखरे, स्पर्धा सचिव डॉ एस एस मारकड प्रा. स्मिता सुरवसे, प्रा. पी पी नरळे, प्रा. शरद सावळे, प्रा. के बी चव्हाण, प्रा. स्वप्नील अंधारे, बी पी एड व एम पी एड विभागाचे प्रशिक्षणार्थी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी व खेळाडूंनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.