बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
अमरावती: येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा पवित्र सण विभागात सर्वत्र साजरा होणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखून भाईचारा व सलोख्याच्या वातावरणात बकरी ईद आनंदात साजरी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा व सुव्यवस्थेबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यावेळी उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, बकरी ईदच्या अनुषंगाने नमाज अदा करतेवेळी प्रत्येक ईदगाहमध्ये आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत. विभागात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे पालन होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बकरी ईद शांततेत व आनंदात साजरी होण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठकी घेण्यात याव्यात व महत्वपूर्ण सुचनांबाबत सर्वांना अवगत करावे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक, गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही, याची नोंद घ्यावी. गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलीसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी यावेळी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून सर्वधर्मिय बांधवांनी एकत्र घेऊन सण-उत्सव साजरा करण्यासाठी पुढे यावयाचे आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारचा गोवंश जसे गाय, वळू, बैल या प्राण्यांची कत्तल करण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ईअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी-विक्री व वाहतूक होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने घ्यावी. पशुधनाची इअर टॅगिंग करण्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करावी. गोवंशाची अवैधरित्या वाहतूकीवर पोलीस विभागाने दक्ष राहून वेळीच कार्यवाही करावी. सणाच्या कालावधीत विभागात कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस विभागाने विभागातील सिमावर्ती भागातील व शहरात दाखल होणाऱ्या चेक पोस्ट चोख बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. यापूर्वी देखील आपण या सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अंमलबजावणी यंदा होईल, याकडे लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिल्या.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती बाबत मदत कार्य व नियोजन बाबत विभागीय आयुक्तांनी बैठकीत आढावा घेतला. मान्सूनपूर्व तयारी व पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी विभागीय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच पोलीस विभागाने दक्ष राहून मदत व सहाय्यतेसाठी सजग राहावे, असे आवाहन डॉ. पाण्डेय संबंधित शासकीय यंत्रणांना केले.
बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच पावसाळ्यात अचानक उद्भणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी पोलीस विभाग सज्ज असून तात्काळ मदत व सहाय्यता पुरविण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पोकळे व पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी यावेळी दिली.