डॉ.सुवर्णा चवरे/ पेनुर
नेटका संसार करत समाजासाठी काहीतरी करणे यासाठी सुशिक्षित असणे आवश्यक नाही, हे कै. मारुती सोपान चवरे यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर दिसून येते. आपल्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी शाळा असावी आणि त्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी या निरक्षर भाऊंनी जे काम केले आहे ते भले दीपगृहासारखे नसेल परंतु मिणमिणत्या पणती सारखे नक्कीच आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन असल्याने त्यांनी केलेल्या छोट्याशा कार्याचा हा थोडक्यात आढावा!
कै. मारुती सोपान चवरे यांचा जन्म मु. पो. पेनुर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी १९४० या वर्षात झाला. घरची परिस्थिती गरिबीची आणि लहानपणीच आई देवाघरी गेली त्यामुळे शिक्षण घेता आले नाही. मावशीकडे राहून त्यानी शेतीच्या गोष्टी शिकून घेतल्या. स्वतःची बागायत जमीन नसल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाऊन, दुसऱ्याचे शेत बटईने करून आणि रोजगार हमीची कामे करून संसाराचा गाडा हाकला. जिज्ञासू वृत्ती आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यामुळे त्यांनी शेतात काही प्रयोगही केले होते. अत्यंत विपरीत परिस्थितीत पेनुर गावात त्यांनी प्रथम डाळिंब शेतीचा प्रयोग केला होता. गावापासून लांब चार किलोमीटर असणाऱ्या वस्तीसाठी रस्ता असावा, शाळा असावी, पिण्याच्या पाण्याची सोय असावी व सरकारच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गावातील नेते व पुढारी यांच्याकडे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता.
वस्ती शाळा:
गावापासून चार किलोमीटर लांब वस्ती असल्यामुळे वस्तीवरील मुलांना शिक्षण घेता येत नव्हते. गावातल्या नेते व पुढाऱ्यांचा पाठपुरावा करून वस्तीशाळा असावी यासाठी प्रयत्न केले. या शाळेच्या प्रस्तावासाठी गावातील पुढारी व नेत्यांना घेऊन ते पंचायत समितीत गेले असता, तेथील अधिकारी व सभापतीने त्यांना विचारले की तुमच्याकडे शाळा हवी असेल तर आम्हाला जमीन द्यावी लागेल. भाऊंनी तिथल्या तिथे पाच गुंठे जागा दानपत्र करून देतो असे आश्वासन दिले आणि “बनाचा ओढा भाग शाळा” ही एकशिक्षकी वस्ती शाळा निर्माण झाली. या वस्तीशाळेचे पहिले शिक्षक कै. सुभाष रामचंद्र साठे यांच्या मदतीने त्यांनी, वस्तीवरील मुलांना शिक्षण देण्यासाठी आवाहन केले. गवताच्या झोपडीवजा एकाच खोलीत गुरुजी चार वर्ग शिकवू लागले. शाळेचे छप्पर दुरुस्त करणे, १५ ऑगस्ट २६ जानेवारी रोजी मुलांसाठी खाऊ आणणे अशा गोष्टी त्यांनी केल्या. नंतर शासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी या ठिकाणी, सिमेंट खोल्या मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. या शाळेस त्यांनी वैयक्तिक निधीमधून कुंपणही करून दिले. या वस्ती शाळेत शिकलेले अनेक जण आज उच्च पदावर कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी:
वस्ती शाळा मंजूर होऊन शाळेचे कामकाज सुरू झाले, मात्र मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. मारुती भाऊंनी स्वतःच्या घरासमोर एक मोठा रांजण बसवला. रोज दीड हजार फुटावर लांब असणाऱ्या एका विहिरीतून ते घागरीने पाणी आणून तो रांजण भरू लागले. रोज दहा-बारा घागरी खांद्यावरून पाणी आणून, तब्बल पंधरा-सोळा वर्षे त्यांनी मुलांना पाणी उपलब्ध करून दिले. पुढे जाऊन त्यांनी मुलांच्या पाण्यासाठी व वस्तीवरील पाण्यासाठी शासनाकडून एक आड (विहीर) मंजूर करून घेतला व त्यासाठीही स्वतःची जमीन शासनास दानपत्र केली.
आयुष्यातील तीस-पस्तीस वर्षे त्यांनी पंढरपूरची न चुकता महिन्याची वारी केली. आपली प्रथा, परंपरा, संस्कृती टिकून रहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जवळजवळ ४५ वर्ष त्यांनी घरी रामनवमी उत्सव साजरा केला केला. यामध्ये वस्तीवरील व गावातील अनेक लोक सामील होत असे. विविध धर्मग्रंथांचे स्वतःच्या घरी नित्य पठण करवून घेतले. यासाठी परिसरातील अध्यात्मिक क्षेत्रातील महाराज, कथा सांगणारे, पोथी वाचणारे, पोथीचा अर्थ सांगणारे यांना ते विनंती करत. घरी नेहमी भजनाचे कार्यक्रम होत असत.
गावापासून चार किलोमीटर लांब असणाऱ्या वस्तीसाठी फक्त कच्ची गाडीवाट होती. तो रस्ता पक्का व्हावा, कमीतकमी खडी-मुरमाचा तरी व्हावा यासाठी त्यांनी गावातील पुढारी तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. गावच्या विकास सोसायटीचे चेअरमन पदही त्यांनी अनेक वर्षे सांभाळले. गावच्या यात्रा कमिटीचे ते महत्त्वाचे पंच होते व गावात मोठ्या प्रमाणावर कुस्त्याचे फड असावेत यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असायचा. आज पंचक्रोशीतील गावांमध्ये पेनुर हे गाव कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. कौटुंबिक परिस्थिती बेताची असताना, स्वतः निरक्षर असूनही त्यांनी गावासाठी आणि वस्तीसाठी जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला. गावातील लहानापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांमध्ये ते लोकप्रिय होते. गावातील वाटणीचे वाद, भावभावकीचे वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेत असत.
वस्तीवरील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या कै. मारुती भाऊ यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण दिले. यापैकी दोन मुले उच्च विद्याविभूषित आहेत. मारुती भाऊ यांच्या पश्चात, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विचाराचा वारसा पुढे सुरू ठेवण्याकरता कृषी, लोककला आणि अध्यात्म या क्षेत्रातील व्यक्तीना दरवर्षी पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे. २०२४ या वर्षाचे पुरस्कार प्रसिद्ध शाहीर व गायक नंदेश उमप, कृषिभूषण दादासाहेब बोडके व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक उध्दवबापू आपेगावकर यांना जाहीर झाले आहेत. निसर्गवारी कृषी पर्यटन केंद्र व चवरे कुटुंबीय यांच्यावतीने दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता या पुरस्कारांचे प्रदान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
शेती, संस्कृती आणि अध्यात्म यांची जोपासना व्हावी असा आग्रह असणाऱ्या मारुती भाऊंचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे, या निमित्त त्यांना विनम्र आदरांजली!
डॉ.सुवर्णा चवरे