MH 13News Network
‘सोलापुरच्या मागील दोन्ही भाजप खासदारांनी विकासकामे केली नाहीत. भाजप मुळे सोलापूर २५ वर्षे मागे गेले आहे तसेच सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार. , अशी भूमिका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली आहे. इंडिया आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, आम आदमी पार्टी, माकप,समाजवादी यासह इतर सर्व घटकपक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद मंगळवारी पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘इंडिया आघाडीने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि आघाडीतील इतर पक्षांनी मला जाहीर पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सर्वाचे आभार मानते. आपण पाहतच आहोत की, मागील दहा वर्षात देशात लोकशाहीला संपवण्याचा घाट घातला जात आहे. शेतकरी, मजूर, कामगार यासह सुशिक्षित युवकवर्गही देशोधडीला लागला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती देखील काही वेगळी नाही. गेल्या दहा वर्षाच्या काळात भाजप आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी मतदारांना केवळ फसवी आश्वासने देऊन विश्वासघात केला. सोलापूर जिल्ह्याला 25 वर्ष मागे नेण्याचे काम केले भाजपने केले आहे .’
भाजपने सोलापूर मतदारसंघात तब्बल तिसऱ्यांदा उमेदवार बदलला आहे. याचाच अर्थ भाजपलाही याची खात्री झाली आहे की, त्यांच्या मागील दोन्ही खासदारांनी मतदारसंघात कोणतेच विकासाचे काम केलेली नाहीत. त्यामुळेच त्यांना दरवेळी खासदारकीचा उमेदवार बदलावा लागत आहे. यावेळी तर त्यांनी बाहेरचा उमेदवार सोलापुरकरांवर लादला आहे , असे देखील प्रणिती शिंदे म्हणाल्या.
भाजपने मतदारांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देण्याऐवजी फोडोफोडीचे राजकारण करण्याला प्राधान्य दिले, राष्ट्रवादी, शिवसेना सारखे पक्ष फोडले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षातील बडे नेते गळाला लावण्याचे काम केले. परंतु जनतेला हा प्रकार रुचला नाही. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर त्याच नेत्यांना पक्षात घेतले. याचा अर्थ हे सगळे आरोप केवळ सत्ता प्राप्तीसाठीच होते. हे जनतेच्या लक्षात आले आहे, मात्र जनता आता भाजपच्या भूल थापांना फसणार नसल्याचेही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. या पत्रकार परिषदेत प्रणिती शिंदे यांनी मागील दहा वर्षात भाजपचे खासदार कशा प्रकारे निष्क्रिय राहिले आणि मतदारसंघात प्रश्न कशा प्रकारे प्रलंबित राहिले याचा पाढाच वाचून दाखवला.
शहराच्या पाणी पुरवठ्यावर बोलताना प्रणिती म्हणाल्या, ‘भाजपने सत्तेत येण्यापूर्वी तसेच महापालिकेच्या निवडणूकीच्या वेळी सोलापूर शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस आणि शहरातील आमदारांनी दिले होते. मात्र आजघडीला नागरिकांना 6 दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे. काँग्रेसच्या काळात झालेल्या पहिल्या जल वाहिनीच्या भरवशावरच आज सोलापुरकरांना पाणी उपलब्ध होत आहे. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सोलापूर शहरासाठी एनटीपीसीच्या माध्यमातून दुहेरी जलवाहिनी मंजुर करून घेतली. मात्र मागील 10 वर्षात त्या दुहेरी जलवाहिनीचे काम पुर्णत्वास गेले नाही. या योजनेसाठी 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता या योजनेला आता 600 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्याची वेळ आली आहे. तरी देखील सोलापूरची जनता तहानेने व्याकूळच राहिली. ही खेदाची बाब आहे.
विमानतळाबाबत बोलताना प्रणिती म्हणाल्या, भाजपने केलेली उडान योजनेची घोषणा पोकळ आणि फसवी ठरली आहे. या उलट कोल्हापूर, सिंधुदुर्ग, शिर्डी नाशिक या ठिकाणाहून विमानसेवा सुरू झाली. मात्र सोलापूरची विमानसेवा सुरू झालीच नाही. तसेच विमानतळास अडथळा ठरणार म्हणून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली. मात्र सात महिने झाले तरीही विमानसेवा सुरू झाली नाही. दुसरीकडं काँग्रेस सरकारच्या काळात सुशीलकुमार शिंदे साहेबांनी बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ मंजूर केले. मात्र, 2014 मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या येथील दोन्ही खासदारांनी गेल्या 10 वर्षात बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एक रुपयांचा निधी आणला नाही. बोरामणीच्या विमानतळास अडथळा ठरणाऱ्या माळढोक प्रकल्पाचा अडथळा दूर करण्यासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही. सोलापूरच्या विकासाला खीळ घालण्याचे काम भाजपच्या खासदारांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास सोलापूरच्या विकासाला अधिक गती मिळणार होती. मात्र त्याकडे यांनी साफ दुर्लक्ष केले.
सोलापूर रेल्वे विभागाचे खच्चीकरण करण्याचे काम या १० वर्षाच्या काळात झालेले दिसून येत आहे. सोलापूर रेल्वे विभागातील दौड स्टेशन हे पुणे विभागाला जोडून सोलापूर विभागाचे क्षेत्र कमी केले. तसेच सोलापूर मुंबई ही सोलापुरातून सुटणारी गाडी गदगमधून सोडली जात आहे. आज घडीला सोलापुरातील प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज घडीला सोलापूरमधून थेट नवी दिल्ली रेल्वे सुरू करण्याचीही गरज आहे. मात्र भाजपच्या खासदारांकडून केंद्र सरकारकडे यासाठी कोणतेच प्रयत्न केल्याचे दिसून येत नाहीत, असा आरोप देखील प्रणिती यांनी केला. कॉँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इंटरसिटी याच रेल्वे गाड्यांनी अजूनही सर्वसामान्य जनता सोलापूर ते पुणे आणि सोलापूर ते मुंबई प्रवास करते .. कॉँग्रेस प्रत्येक गोष्ट करताना सर्वसामान्य गरीब माणसाचा विचार करायची .. वंदे भारत ट्रेनच तिकीट सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच आणि त्याच्यासाठी खर्चीक आहे हा मुद्दा देखील त्यांनी मांडला.
सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आले. मात्र अद्यापही सोलापूरकरांची धुळीपासून सुटका झालेली नाही. स्मार्ट सिटीमध्ये लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नाही, सहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. स्मार्ट सिटीसाठी एक सक्षम अशी परिवहन सेवा सोलपुरात उपलब्ध नाही. स्मार्ट सिटीच्या कामात केवळ भ्रष्टाचाराला खत पाणी घातले गेले. स्वत: भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीच स्मार्ट सिटीच्या कामावर नाराजी व्यक्त करत भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. मात्र त्याकडेही सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करत सोलापूरची वाट लावली, असा घणाघात देखील प्रणिती यांनी यावेळी केला.
भाजपने सत्तेत येण्यापूर्वी युवकांना रोजगार, असंघटीत कामगारांसाठी काम, सोलापूरसाठी गारमेंट पार्क, अक्कलकोट, मंगळवेढा, मंद्रुप, पंढरपूरमध्ये एमआयडीसी आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही आश्वासने हवेतच विरली आणि सोलापूरचा युवक, कामगारवर्गही देशोधडीला लागला. सोलापूरमध्ये बेरोजगारांची संख्या अधिकच वाढत गेली. सोलापुरातील गारमेंट उद्योजकांना सतत अडचणी निर्माण केल्या जातात. शालेय गणवेशाचे कंत्राटे बाहेरच्या व्यक्तींना दिली जातात, असा गंभीर आरोप देखील प्रणिती यांनी यावेळी केला.
प्रणिती पुढे म्हणाल्या, सध्या सोलापूरमध्ये जे राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. त्यांची मंजुरीही युपीए सरकारच्या काळातच झालेली आहे. यामध्ये सोलापूर-पुणे, सोलापूर-येडशी, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे.
भाजप सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल हे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे झाले. भाजपने शेतकरी राजाला देशोधडीला लावण्याचे काम केले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तर मेटाकुटीला आला. मात्र येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी वेळ द्यावा असे वाटले नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस, डाळिंब, द्राक्ष, कांदा, तसेच ज्वारी, सोयाबीन उत्पादन घेतले जाते. मात्र मागील १० वर्षापासून शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय अडचणीचा ठरत आहे. भाजप सरकारने शेती व्यवसायाला उद्धवस्त केले. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या धोरणांचा खुप मोठा फटका बसला. शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही, दिवसा वीजपुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित, कांदा निर्यांतबंदीचा शेतकऱ्यांना फटका, दूधाला योग्य दर नाही. सोयाबीनला योग्य मिळाला नाही, शेतकऱ्याविषयी बोलताना प्रणिती यांनी असा तक्रारीचा पाढाच वाचला.
दरम्यान, यावेळी प्रणितीताई शिंदे यांनी देशात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफीची योजना काँग्रेसने राबवल्याच्या ऐतिहासिक घटनेकडेही लक्ष वेधले आणि भाजपकडून केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केला..
भाजप सरकार सत्तेत आल्यापासून जीएसटी कर प्रणालीमुळे व्यापारी वर्गातून प्रचंड असंतोष आहे. जीएसटी कर रचनेत फेर बदल करण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. मात्र दिवसेदिवस ही कर रचना अधिकच कठोर आणि व्यावसायिकांना तोट्यात आणणारी ठरताना दिसून येत असल्याचा आरोपही यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला. प्रणिती यांनी दहा वर्षातील प्रलंबित कामाचा पाढा वाचत भाजप खासदारांच्या निष्कियेतेवर बोट ठेवले. तसेच आगामी काळात भाजपच्या उमेदवाराने सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावे असे आवाहन देखील या प्रसंगी केले. तसेच प्रणिती शिंदे यांनी ‘मी सोलापूरची लेक सोलापूरकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन देत मतदारांना आपल्याला प्रंचड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे, माजी गृहराज्य मंत्री सिद्धराम म्हेत्रे, कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, काँगेस जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पवार, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, यु एन बेरिया, अमर पाटील, उत्तमप्रकाश खंदारे , आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील, शहर अध्यक्ष निखिल किरनाळे, महेश गादेकर, प्रमोद गायकवाड, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सुरेश हसापूरे, संजय हेमगड्डी, प्रकाश वाले, नाना काळे, मनोज यलगुलवार, एम एच शेख, मनोहरपंत सपाटे, अशोक निंबर्गी, नलिनी कुलकर्णी, विष्णू कारंमपुरी, निलेश संगेपाग, आदी मान्यवर नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.