नवी दिल्ली : महाराष्ट्रातील चार केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आज त्यांना सोपविण्यात आलेल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला. या मंत्र्यांमध्ये रामदास आठवले, प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.
रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना त्यांनी औषधीय वनस्पती रोपण करून आरोग्य क्षेत्रात नव्या कल्पनांचा प्रारंभ केला.
श्रीमती रक्षा खडसे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सहकार मंत्रालय महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, असा विश्वास श्री. मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.