mh 13 news network
पालकमंत्री जयकुमार गोरे व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचीही उपस्थिती
सोलापूर . स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामास शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली असून या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाधववाडी, ता. सांगोला येथे दुपारी दोन वाजता होणार आहे, अशी माहिती भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
सदर योजनेकरिता उजनी धरणामधून २.०० अ.घ.फू. पाण्याची तरतूद असून या पाण्याद्वारे सांगोला तालुक्यातील दुष्काळी लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहुद, कटफळ, खवासपूर लोटेवाडी व इटकी या १२ गावातील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर क्षेत्रास व सांगोला शाखा कालवा क्र. ५ अंतर्गत २ हजार ३४५ हे. असे एकूण १५ हजार ४०० हे. क्षेत्राचा सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ब-याच वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असून कायमस्वरुपी दुष्काळ असलेला हा भाग सिंचनाने सुजलाम-सुफलाम होणार आहे.