MH 13 News
सोलापूर : अवैध व्यवसायातील पैशांच्या हिशोबाच्या वादातून घडलेल्या अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बाळू उर्फ औदुंबर प्रकाश काळे (रा. विजापूर रोड, सोलापूर) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.
सरकारी पक्षाच्या मते, अवैध व्यवहारातील आर्थिक वादातून आरोपी काळे व त्यांच्या भागीदारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी आरोपी व त्यांच्या साथीदारांनी कट रचून इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागील कार्यालयात जबरदस्ती प्रवेश केला. तेथे हिशोबाच्या कागदपत्रांची मागणी करत साहित्याची तोडफोड करण्यात आली.
दरम्यान, कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना अथर्व जाधव यांच्यावर बांबू, कुऱ्हाड, कोयता व तलवारीने गंभीर वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सरकारी बाजूने न्यायालयात मांडण्यात आली.
या प्रकरणात सोलापूर सत्र न्यायालयाने यापूर्वी काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली.
बचाव पक्षाने आरोपीला खोटेपणाने अडकविण्यात आल्याचा दावा करत, मृत्यू हा अपघाती स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करत मुक्ततेचे आदेश दिले.
आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे ॲड. ए. एस. साळगावकर यांनी युक्तिवाद केला. या निर्णयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








