दक्षिणमधील मान्यवरांसह शेकडो लोकांचा सहभाग
सोलापूर लोकसहभागातून पर्यटन क्षेत्रांचा विकास केला तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. होटगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र हे त्याचे उत्तम मॉडेल आहे. या केंद्रावर उद्योगातून अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी आहेत. राज्य शासनाच्या आई योजनेतून पर्यटन क्षेत्रात विविध उद्योग सुरू करणार्या महिलांना बिनव्याजी कर्जपुरवठा होत असून याचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात त्यांनी पुढे यावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निसर्गरम्य होटगी तलाव साईमंदिर पर्यटन केंद्र येथे आयोजित पर्यटन परिसंवाद कार्यक्रमात आ. देशमुख बोलत होते.
वृक्षारोपणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्यात सुशोभिकरणास प्राधान्य देण्यात आले असून आता दुसर्या टप्प्यात बोटींगसह शहरवासियांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे विकास होणार आहे. तलाव परीसर विकसित करून रोजगारनिर्मितीस प्राधान्य दिले जाणार आहे, असे आ. सुभाष देशमुख म्हणाले.
शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून कृषि पर्यटनात पुढाकार घ्यावा. हुरडा निर्मितीस महत्व प्राप्त झाले असून त्याबरोबरच पर्यटकांच्या आवडीनिवडीनुसार रोजगार करून स्वतःच्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन करत गांधी जयंतीपासून मतदारसंघातील प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम सुरू करून समृध्द गाव व समृध्द कुटुंब योजना राबवली जाणार असल्याचे आ. सुभाष देशमुख म्हणाले.
यावेळी पर्यटन केंद्रावर उभारण्यात आलेल्या प्रत्येक पॉईंटला नागरिकांनी भेट दिली. सेल्फी घेत वेगळा आंनद लुटला. यावेळी अस्सल सोलापुरी भोजन, झुणका-भाकरी, शेंगाचटणी, हुग्गीचा अस्वाद नगारिकांनी घेतला.
या कार्यक्रमास डॉ. व्यंकटेश नेतन, अभय दिवाणजी, निलेश शहा, कुलगुरू प्रकाश महानवर, सिध्देश्वर सर्जे, राम रेड्डी, संजय थोरात, प्रल्हाद कांबळे, रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, अंबिका पाटील, जगनाथ गायकवाड, निलीमा शितोळे, सुवर्णा पवार, विजयकुमार बरबोडे, साई मंदिरचे ट्रस्टी यांच्याबरोबर सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुणे, मुंबईसारख्या वन-डे ट्रीप कनसेप्ट आता सोलापुरात..!
वन डे ट्रीपची पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातील कनसेप्ट आता सोलापुरात रूजू लागली आहे. आ. सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात विकसित केलेल्या सहा पर्यटनक्षेत्रांमुळे आता वन डे ट्रीप शक्य होणार आहे, असे परिसंवादात सहभागी राहुल क्षीरसागर, अंजना पळसुले, ऋषिकेश कुलकर्णी, युवराज पाटील, विशाल गायकवाड आदींनी सांगितले.