MH13 News
२९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
सरकारला २८ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम; आंदोलनापूर्वी ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा..
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण न झाल्यास, २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जरांगे पाटील यांनी सरकारला अंतिम मुदत देत शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे तातडीने कुणबी प्रमाणपत्रे वाटप करावे, अशी प्रमुख मागणी केली आहे. तसेच ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, हैदराबाद व सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशा विविध मागण्यांचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
सोलापूरसह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत प्रत्यक्ष गाठीभेटी
आगामी आंदोलनापूर्वी मराठा समाजाशी थेट संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील ७ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत.
या दौऱ्यात ते मराठा समाजबांधवांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
🔸 ७ ऑगस्ट (शुक्रवार): अंतरवाली ते तुळजापूर – प्रत्यक्ष गाठीभेटी बैठक; तुळजापूर येथे मुक्काम.
🔸 ८ ऑगस्ट (शनिवार) – सोलापूर जिल्हा:• सकाळी १० वा. – वडाळा (ता. उत्तर सोलापूर)• दुपारी ३ वा. – माढा • सायं. ७ वा. – पंढरपूर (मुक्काम)🔸 ९ ऑगस्ट (रविवार):• सकाळी १० वा. – सरकोली (ता. पंढरपूर)• दुपारी ३ वा. – सांगोला• सायं. ७ वा. – आटपाडी (जि. सांगली)🔸 १० ऑगस्ट (सोमवार):• कवठे महांकाळ• बोरगाव (ता. वाळवा)• कडेगाव🔸 ११ ऑगस्ट (मंगळवार):• मायणी (ता. खटाव)• मसूर (ता. कराड)• कोल्हापूर येथे बैठक व मुक्काम🔸 १२ ऑगस्ट (बुधवार):• पाटण• सातारा येथे बैठका घेऊन दौऱ्याची सांगता.
या दौऱ्यात मराठा आरक्षण, सगेसोयरे अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्रे आणि समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर थेट संवाद साधण्यात येणार असून, २९ ऑगस्टपासून होणाऱ्या आंदोलनाची दिशा आणि पुढील रणनीतीही समाजासमोर मांडली जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे आणि प्रस्तावित आंदोलनाकडे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.







