निर्बीजीकरण, अँटी-रेबीज लसीकरण आणि तक्रार निवारण यंत्रणा बळकट करण्यावर भर
MH13 News network
सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि कुत्रा चावण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी पशुवैद्यकीय व आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. नागरिकांच्या तक्रारींवर जलद कार्यवाही करण्यासाठी दोन डॉग कॅचिंग वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, माजी महापौर कांचना यन्नम, नगरसेवक नारायण बनसोडे, आरोग्य अधिकारी राखी माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले आणि डॉ. सुहासिनी वाळवेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे, कुत्रा चावण्याच्या घटना कमी करणे, निर्बीजीकरणाची कार्यवाही अधिक प्रभावी करणे आणि मोठ्या प्रमाणावर अँटी-रेबीज लसीकरण करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तक्रारींवर तातडीने कार्यवाही
भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर जलद कार्यवाही करण्यासाठी डॉग कॅचिंग वाहनांची संख्या वाढविण्याची गरज बैठकीत मांडण्यात आली. पशुवैद्यकीय विभागामार्फत आणखी चार वाहने उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावर महापौर विनायक कोंड्याल यांनी दोन डॉग कॅचिंग वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. अतिरिक्त वाहनांमुळे शहरातील विविध भागांत एकाच वेळी कार्यवाही करून नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे शक्य होणार आहे.
निर्बीजीकरणासह विशेष अँटी-रेबीज लसीकरण मोहीम

पशुवैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्राणी जन्मनियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेताना शहरातील विविध भागांत निर्बीजीकरणाची कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच भटक्या कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर अँटी-रेबीज लसीकरण करण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याबाबत चर्चा झाली. विभागनिहाय नियोजन करून अधिकाधिक कुत्र्यांना लसीकरणाच्या कक्षेत आणणे आणि निर्बीजीकरण व लसीकरणाचा प्रभावी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आक्रमक व रेबीज संशयित कुत्र्यांवर विशेष लक्ष

रेबीज संशयित तसेच अत्यंत आक्रमक कुत्र्यांना सुरक्षितपणे पकडणे, त्यांचे निरीक्षण व पशुवैद्यकीय तपासणी करणे आणि लागू कायदे व नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली.नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतानाच प्राणी कल्याणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक परिस्थितीत दयामरणाची कार्यवाही ही केवळ लागू कायदे, नियम आणि अधिकृत पशुवैद्यकीय प्रक्रियेनुसारच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कचरा व्यवस्थापन आणि जनजागृतीवरही भर

भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी केवळ निर्बीजीकरण पुरेसे नसून निर्बीजीकरण, अँटी-रेबीज लसीकरण, तक्रार निवारण, आक्रमक कुत्र्यांवरील कायदेशीर व पशुवैद्यकीय कार्यवाही, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती या सर्व उपाययोजनांचा समन्वय आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.उघड्यावर कचरा पडणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनीही रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा टाकू नये, याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कुत्रा चावल्यानंतर तातडीने उपचाराचे आवाहन

महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अँटी-रेबीज लसीकरण सुविधेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. कुत्रा चावल्यानंतर नागरिकांनी विलंब न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत, याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
“सोलापूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी निर्बीजीकरण, अँटी-रेबीज लसीकरण, तक्रार निवारणाची यंत्रणा, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती या सर्व बाबींवर एकत्रितपणे काम करण्यात येईल. वैज्ञानिक, कायदेशीर, मानवीय आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून ही समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे,” असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.बैठकीस पशुवैद्यकीय विभाग व आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Solapur Municipal Corporation, Solapur







