MH 13news Network
जया भाऊ..! एक नजर इधर भी..! इथे विकास लंगडतोय..! अजूनही सोलापूरकर आशावादी..
महेश हणमे / सोलापूर
मटण महाग झाले म्हणून आंदोलन करणारे कोल्हापूरकर कुठे ! समस्यांच्या विळख्यात असणारे आपण सोलापूरकर कुठे..! अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. राज्यात सर्वाधिक असणारा सोलापूरचा रेडी रेकनर दर, चाके रुतलेली असणारी आर्थिक डबघाईला आलेली परिवहन व्यवस्था, इ टॉयलेट,विमानसेवा, उद्याने, जलतरण तलाव, अतिक्रमण, पार्किंगच्या गिळून टाकलेल्या जागा, खड्डेमय रस्ते अशा एक ना अनेक अस्सल सोलापुरी प्रश्नांवर पालकमंत्री जया ‘भाऊं’नी एक नजर टाकणे गरजेचे आहे. कारण याच ठिकाणी विकास लंगडतोय तरी अजूनही सोलापूरकर आशावादीच आहेत.
राज्यातल्या महापालिकेच्या वर्गवारीनुसार सोलापूर महानगरपालिकेचा रेडी रेकनर दर हा सर्वात जास्त आहे. याचा थेट परिणाम प्रॉपर्टी खरेदी विक्रीवर होत असल्याने शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. या आधी सुपर टॅक्समुळे शहरवासीयांचे कंबरडे मोडले होते.मोठ्या आयटी कंपन्या, मॉल, शॉपिंग बाजार यांच्यावर वाढलेल्या रेडिरेकनरचा थेट परिणाम होईल. परिणामी दुसऱ्या वर्गातील असलेल्या शहरांकडे उद्योजक जातील. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरात उद्योग व्यवसाय करणे त्यांना फायदेशीर ठरेल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत निर्णय घ्यावा, सोलापूरकरांची कैफियत मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे मांडावी अशी मागणी समाज माध्यमांमधून जोर धरत आहे.
आर्थिक डबघाईला आलेली परिवहन व्यवस्था चालवणे सोलापूर महापालिकेसाठी मोठे जिकरीचे ठरले आहे. शाळकरी मुली, दिव्यांग, ग्रामीण भागातून येणारे नागरिक, विविध शासकीय कामांसाठी येणारे गरजू यांच्यासाठी स्वस्तातली परिवहन व्यवस्था महत्त्वाची ठरते. अत्यंत आर्थिक डबघाईला आलेल्या परिवहन उपक्रमामुळे बसेस रस्त्यावर धावत नाहीत. आणि ज्या बसेस धावत आहेत त्यांची संख्या अल्प आहे. कधीकाळी याच परिवहन उपक्रमाने महापालिकेला कर्जरूपाने मदत केली होती. पालकमंत्री गोरे यांनी विशेष बाब म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
महापालिकेवर भाजपची सत्ता होती, राज्यात महायुतीचे सरकार आणि केंद्रात सत्ता आहे. विधानसभेत भाजपला शहरातून भरभरून यश मिळाले आहे. त्याची उतराई होण्याची वेळ आता सत्ताधाऱ्यांची आहे.
इथे लंगडतोय विकास..!
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर खोदून ठेवले होते. जागोजागी धूळ, खड्डे, रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली..! अनेक ठिकाणी तात्पुरती ठिगळपट्टी..
ई टॉयलेट की शोभेचे निरुपयोगी डब्बे..
शहरात काही ठिकाणी ई टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बहुतांशी सर्व ई टॉयलेट हे बंद आहेत. निरुपयोगी शोभेचे डबे असे नाव सोलापूरकरांनी त्यांना दिले आहे.
विमान निश्चित कधी उडणार..! हे छातीवर हात ठेवून कोणीही सांगू शकत नाही. विमान सेवा ही चेष्टेचा विषय बनून राहिली आहे.
बंद अवस्थेत असणारे जलतरण तलाव!
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू सोलापूरने देशाला दिले आहेत. तरीही सुंदरम नगर येथील जलतरण तलाव कोट्यावधी रुपये खर्चून ही बंद अवस्थेत. मार्कंडेय तलावाचे सुद्धा तसेच हाल आहेत.
लाडक्या बहिणींना कधी मिळणार स्वच्छतागृहे..?
डब्ल्यू एच ओ च्या मार्गदर्शक नियमाप्रमाणे धड खेडे ना शहर असलेल्या सोलापुरात महिला भगिनींसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही.
प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत..?
लहान मुलांनी फक्त कार्टून बघायचे, आणि पशुपक्षी प्राणी फक्त मोबाईलवर..! असंच काहीसं चित्र, कारण शहरातील प्राणी संग्रहालय विविध कारणामुळे बंद आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रबळ राजकीय शक्तीची गरज..
जागोजागी अतिक्रमण
शहरात जागोजागी अतिक्रमण झाल्यामुळे यावर नियंत्रण ठेवणारा कोणी नाही का? असा सोलापूरकरांचा सवाल
पार्किंगच्या जागा गिळल्या कुणी.?
मोठमोठ्या इमारतींच्या पार्किंगच्या जागा नेमक्या आहेत कुठे.? गाड्या कुठे पार्क करायच्या.? हा जवळपास प्रत्येक सोलापूरकरांचा प्रश्न आहे.
एडवेंचर पार्क, मंदिरातील लेझर शो, स्ट्रीट बाजार कधी होणार सुरू..? आम्ही फिरायला जायचं कुठं..? सोलापूरकरांच्या प्रश्नाला कोण देणार उत्तर..! असे अनेक प्रश्न आ वासून उभे असल्याने विकास इथे लंगडतोय..! अशीच चर्चा सामाजिक संघटनांमधून सुरू आहे.
उपरा, परका नाही मी तर घरचा सदस्य..!
पालकमंत्री गोरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत मी सोलापूरसाठी उपरा किंवा परका नाही तर घरचा सदस्य असल्याची भावना व्यक्त केली होती.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा यादी चा शेवटचा टप्पा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, माढ्यातील अरण येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी साठी 100 कोटीचा निधी मिळवून देण्यात पालकमंत्र्यांचा सिंहाचा वाटा आहे.
उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती मध्ये उन्हाळी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन, समांतर जलवाहिनीसाठी निधी, पाकणी येथे 66 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी भूसंपादन प्रक्रिया, नवीन पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन, मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन, पाणीपुरवठा वाढण्यासाठी पंपिंग क्षमता वाढवण्याचे काम यामध्ये पालकमंत्री गोरे यांनी एक सोलापूरचा सदस्य असलेली भूमिका प्रभावीपणे बजावली आहे.
सहकारी आमदारांसोबत केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी शहरासाठी मोठा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे.
आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे हे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्यांची सकाळी दहा वाजता महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदचे सीईओ,पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा असणार आहे.
संधीचे नाही तर संकटाचे सोने करावे..!
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूरला विशेष काही मिळाले नाही. त्यामुळे येथील जनता नाराज आहे. ही नाराजी दूर करण्याची क्षमता आणि संधी पालकमंत्र्यांना आहे. सोलापूरकरांच्या समस्या हे सत्ताधारी पक्षांवरील संकट आहे. या संकटाचे सोने करावे. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.