मुंबई : कर्नाटक विधानपरिषदेची विनंती अर्ज समिती आणि सभागृह समिती मंगळवार, दिनांक 2 जुलै, 2024 रोजी मुंबई येथे अभ्यासदौऱ्यावर येत आहे. यावेळी या दोन्ही सभागृह समिती महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती, डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या संबंधित समितीच्या कामकाजाची माहिती या अभ्यास भेटीत कर्नाटकची समिती जाणून घेणार आहे. कर्नाटकमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे द्विसभागृह पध्दती आहे.
कर्नाटक विधानपरिषदेच्या समित्यांपैकी विनंती अर्ज समिती आणि सभागृह समिती मंगळवार, 2 जुलै, 2024 रोजी मुंबई अभ्यासदौऱ्यात विधानभवन, मुंबई येथे भेट देणार असून या भेटीदरम्यान दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे अवलोकन करणार आहे. तसेच या समित्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या संबंधित समित्यांबरोबर मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या दालनात सायंकाळी 4.30 वाजता अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा.उप सभापती या विधानपरिषद विनंती अर्ज समितीच्या पदसिद्ध समिती प्रमुख आहेत. या अभ्यासभेटी प्रसंगी मा.उप सभापती तथा विनंती अर्ज समिती प्रमुख डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत समितीचे अन्य सदस्य देखील उपस्थित राहतील आणि कर्नाटक समिती सदस्यांशी चर्चा करतील. कर्नाटक विधानपरिषदेचे मा.उप सभापती तथा विनंती अर्ज समिती आणि सभागृह समितीचे समिती प्रमुख म्हणून श्री.एम.के.प्राणेश हे अन्य समिती सदस्यांसह या अभ्यासभेटी प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.