MH 13News Network
एक कोटी पेक्षा जास्त खर्चुन बांधली शाळेची सुसज्ज इमारत
सोलापूर – सोलापूर येथील लक्ष्मी हाइड्रॉलिक्स या कंपनीने उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील मराठी शाळेचे पुनरुज्जीवन केले आहे. एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी खर्च करून या शाळेसाठी नवी सुसज्ज इमारत उभारण्यात आल्याची माहिती कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शरद कृष्ण ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रानमसले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी बांधलेल्या या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी साडे आठ वाजता जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते होणार आहे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे अध्यक्षपद भूषविणार आहेत. ज्येष्ठ संपादक संजय आवटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून लक्ष्मी हाइड्रॉलिक्स प्रा लि चे टेक्निकल डायरेक्टर आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती असणार आहे.
चिंचोळी एमआयडीसी मध्ये मुख्यालय असलेली लक्ष्मी हाइड्रॉलिक्स ही भारतातील नामांकित इलेक्ट्रिक मोटर्स बनविणारी कंपनी आहे. मागील चाळीस वर्षांपासून कार्यरत असणारी ही कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्सचे उत्पादन करते. दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक मोटर्सचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठीच्या निधीतून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.
रानमसले जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची इमारत मोडकळीस आली होती व त्यामुळे विद्यार्थी या शाळेत येत नव्हते, शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. ही माहिती लक्ष्मी हाइड्रॉलिक्सचे एम. डी. श्री शरद कृष्ण ठाकरे यांनी वर्तमानपत्रात वाचली तेव्हा त्यांनी ठरविले की कंपनीच्या खर्चाने CSR उपक्रमांतर्गत शाळेला नवीन इमारत व सुविधा उपलब्ध करून द्यायच्या व विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळायचे. निर्णय होताच कार्यवाही सुरु झाली आणि सात महिन्यातच शाळेची आकर्षक वास्तू उभी राहिली. या काळात शालेय शिक्षण समिती, गावचे सरपंच, उपसरपंच व समस्त ग्रामस्थ यांचे चांगले सहकार्य लाभले.
या इमारतीमध्ये पाच वर्ग खोल्या, कार्यालय, स्वच्छतागृह, संरक्षक भिंत, फर्निचर आणि इतर आवश्यक सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. शहरातील अत्याधुनिक खाजगी शाळांच्या तोडीस तोड सुविधा येथे निर्माण करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या शाळेत शिकणारे २२५ विद्यार्थी, दहा शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी चांगली सोय झाली आहे. आता ही शाळा कधीच बंद पडणार नाही.
शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी साडे आठ वाजता होणार आहे. या उदघाटन समारंभास जिल्हा परिषद ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षणप्रेमी नागरिक आणि ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मी हाइड्रॉलिक्स प्रा. लि. कंपनीतर्फे करण्यात आले आहे.